आता… दारूची दुकाने आणि परमिट रूम बियर बारवर राष्ट्रपुरुष देव-देवतांची नावे देण्यास बंदी !
गड किल्ल्यांची नावे सुद्धा देता येणार नाहीत !!
प्रतिनिधी —
दारूची दुकाने आणि परमिट रूम, बियर बार यांना देव-देवतांची, राष्ट्र पुरुषांची, महनीय व्यक्तींची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे.

सध्या देव-देवतांची, राष्ट्रपुरुषांची, गड किल्ल्यांची नावे असल्यास ती ३० जूनपर्यंत बदलण्यात यावी अशी मुदत अशा सर्व प्रकारच्या आस्थापना मालकांना देण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी मद्याची दुकाने, परमिट रूम, बियर बार यांना देव-देवतांची, राष्ट्रपुरुषांची तसेच गड किल्ल्यांची नावे देण्याचा सपाटा चालू आहे. याबाबत माहिती घेतली असता असे प्रकार अनेक ठिकाणी आढळून आले आहेत. राज्यातील काही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड किल्ल्या विषयी तसेच राष्ट्र पुरुषांविषयी प्रत्येकाच्या मनात आस्था आहे. त्यामुळे देव-देवता ,राष्ट्रपुरुष आणि गड-किल्ले यांच्या नावाचा वापर केल्यास ही विटंबना तर होतेच त्याशिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जातात. आणि सामाजिक वातावरणही खराब होते.

राज्यातील गडकिल्ले आणि राष्ट्रपुरुष यांचा तसेच सर्वांच्या धार्मिक स्थानांचा आदर करणे व सामाजिक सलोखा कायम राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी राज्यांमध्ये जे कोणीही अशा प्रकारे मद्य विक्री अथवा मध्यपान सेवा देणाऱ्या आस्थापनांवर अशी नावे टाकतात त्या सर्व धर्मियांच्या देव-देवता, धार्मिक, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती, गड-किल्ले अशा प्रकारची नावे देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

राज्यातील मद्य विक्रीची दुकाने व परमिट रूम बियर बार यांना कुठल्याही प्रकारे राष्ट्रपुरुषांची गड-किल्ल्यांची देवदेवतांची नावे देण्यात येत नाहीत. याची यादी जाहीर केली आहे. त्यात राज्यातील १०५ गड-किल्ल्यांचा नावांचा समावेश आहे.
सध्या ज्या मद्य विक्रीची दुकाने, परमिट रूम, बियर बार व तशाच प्रकारच्या आस्थापनांवर देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची, गड किल्ल्यांची व इतर महनीय व्यक्तींची नावे असतील ती ३० जून पर्यंत बदलण्यात यावीत असे आदेश सरकारच्यावतीने देण्यात आले आहेत.

