संगमनेर शहर पोलिस निरीक्षकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी
अमोल खताळ यांची लाचलुचपत महासंचालकांकडे तक्रार
प्रतिनिधी —

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून कमविलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी लाचलुचपत विभागाकडे केले असून त्या संदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे.

पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग मुंबई यांच्याकडे केलेल्या तक्रारीत खताळ यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेर येथील कार्यकाळात पदाचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गाने कमविलेल्या आर्थिक व बेहिशोबी मालमत्तांची चौकशी करून कारवाई बाबत मी या आधी तक्रार केली आहे. त्यानुसार पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांनी नाशिक विभागाचे लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक कडासने यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी माझी तक्रार पाठवली आहे.

संगमनेर शहरात १३ नोव्हेंबर २०२० पासून नियुक्ती झालेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे शहरातील नाशिक-पुणे रोड वरील पंचवटी या पंचतारांकित हॉटेल मध्ये रहिवास करत असून त्याबाबत वरिष्ठांची/शासनाची परवानगी घेतलेली नाही. असे समजते.
त्या हॉटेल मधील १ दिवसाचे भाडे कमीत कमी १७०० ते २५०० रुपये असून त्याप्रमाणे तेथील मासिक भाडे हे ५१००० रुपये होते. नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२२ पर्यंत १५ महिन्यांचे भाडे अंदाजे ८ लाख रुपये होत आहे.

एका सामान्य पोलीस निरीक्षकांच्या पगार मध्ये पंचतारांकित हॉटेल मधील वास्तव्य परवडू शकते याचा अर्थ ते त्यांच्या पदाचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवीत आहेत हे सिद्ध होते. याबाबत खात्री करण्यासाठी तेथील CCTV कॅमेरे व पीआय देशमुख यांचे मोबाईल लोकेशन वरून त्याचे तेथील वास्तव्य सिद्ध होऊ शकते.
यापूर्वी एक सत्ताधारी राजकीय पक्षाच्या प्रमुखाने शहर पोलीस निरीक्षक यांच्यावर ५५ लाख रुपये दरमहा हप्ता घेत असलेच्या तक्रारी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्याकडे तसेच गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्याकडे केलेल्या आहेत. तसेच ऑक्टोंबर २०२१ मध्ये संगमनेर येथे कत्तलखाने आंदोलन प्रसंगी हिंदुत्ववादी संघटनांनी व स्थानिक भारतीय जनता पक्ष यांनी पोलीस निरीक्षक देशमुख हे कत्तलखाने चालकांकडून २७ ते ३० लाख हप्ते दरमहा घेतात असे आरोप केलेले आहेत.

०२ ऑक्टोबर २०२१ रोजी कत्तलखान्यांवर झालेली कारवाई हि पोलीस अधीक्षक यांना भेटलेल्या गुप्त माहिती वरून होऊन त्यात मोठी रक्कम जनावरे आणि गोवंश मांस पकडण्यात आले होते. कत्तलखाने काही दिवस बंद होते. पण संगमनेर शहर हद्दीतील अवैध कत्तलखाने पुन्हा सुरु कसे झाले ? आज देखील संगमनेर येथील विविध माध्यमांमध्ये संगमनेर येथील अवैध गोवंश हत्या, गुटखा, गांजा, वाळू यांच्या बातम्या प्रसारित होत असतात. यावरून स्पष्ट होते कि, पोलीस निरीक्षक देशमुख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंबन करून अमाप संपत्ती कमविलेली आहे. ऑक्टोबर २०२१ मधील आंदोलन प्रसंगी त्यांच्या पंचवटी हॉटेल मधील वास्तव्य प्रकरणी प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु त्यांनी माझे राजकीय संबंध असल्यामुळे माझ्यावर कुठलेही कारवाई होऊ शकत नाही अशी वल्गना केली होती.

आजही पीआय देशमुख यांचे हॉटेल पंचवटी येथे वास्तव्य असून तिथे नाश्ता, जेवण यांचाही विचार केल्यास अंदाजे ७५००० रुपये दरमहा खर्च सुरु आहे. देशमुख यांनी पोलीस विभागात नोकरीला लागल्यापासून पदाचा दुरुपयोग करून करोडो रुपये संपत्ती कमविली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार निःपक्षपातीपणे कारवाई करावी हि विनंती. पीआय देशमुख हे नेहमी सांगत असतात कि माझे राजकीय व पोलीस विभागात, लाचलुचपत विभागात वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर संबंध असल्यामुळे माझे कोणीच काही करू शकत नाही. किती हि तक्रारी करा मला फरक पडत नाही.
मी केलेल्या तक्रारीमुळे पीआय देशमुख हे माझ्यावर खोटा गुन्हा अथवा माझ्या जीविताला धोका निर्माण करू शकतात तरी माझ्या जीवाचे काही बर वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी पीय देशमुख जबाबदार राहतील. अशाप्रकारे खताळ यांनी तक्रारीत विविध मुद्दे उपस्थित केलेले आहेत.
