घारगाव येथे चंदन चोरांचा धुमाकूळ !

चोरांची ग्रामस्थांवर दगडफेक

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पठार भागात चंदनाच्या झाडांच्या चोरीचे सत्र सुरूच आहे. करवंदवाडी (घारगाव) येथील विलास रामचंद्र आहेर यांच्या घरालगतची चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी कापली असून, त्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला आहे. ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने चोरट्यांनी ग्रामस्थांवर दगडफेक केली.

करवंदवाडी परिसरातून यापूर्वीही चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. हे चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चंदनाच्या झाडाला छिद्रे पाडून झाडाचा गाभा तपासून घेतात मगच झाड कापून घेऊन जातात. चंदन चोरट्यांचा पठार भागात सुळसुळाट झाला आहे. असाच प्रकार तालुक्यातील घारगाव ( करवंदवाडी) येथे घडला.

येथील शेतकरी विलास आहेर यांच्या राहत्या घराच्या आवारातील दोन चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास कापण्यास सुरवात केली. यावेळी आहेर यांना झाडे तोडण्याचा आवाज आला. ते बाहेर आले. आहेर हे घराबाहेर येण्याचा आवाज चोरांना आला. चोरट्यांनी झाडांचा काही भाग कापून लगतच्या शेताच्या बांधाखाली नेऊन टाकला. तर काही भाग जागेवरच सोडून शेताच्या बांधाखाली लपून बसले.

आहेर यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना फोनवरून कळविले. ग्रामस्थ जमा होऊन त्यांनी झाडांकडे जाण्याचा प्रयत्न केला. अंधारात चौघेजण असल्याचे ग्रामस्थांना दिसले. मात्र चोरट्यांनी ग्रामस्थांवर दगडफेक केली. काहींनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी धूम ठोकली. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!