महारक्तदान शिबिरात उच्चांकी रक्तदान !
१०३७ जणांचा सहभाग

शिवजयंती उत्सव युवक समिती चा उपक्रम
प्रतिनिधी —
शिवजयंती उत्सव युवक समितीच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराने यावर्षीचा उच्चांक साधला आहे. रक्तदान श्रेष्ठदानाचा संदेश देणाऱ्या या शिबीरामध्ये शुक्रवारी उत्सव समितीच्या १०३७ तरुण आणि महिलांनी रक्तदान केले. उत्सव समितीच्या या शिबीरास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या उत्सव समितीच्या माध्यमातुन दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षीदेखील आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती २१ मार्चला साजरी होत आहे. शिवजयंती निमित्त उत्सव समितीच्या माध्यमातुन गेल्या ११ वर्षापासून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवले जातात. क़ोरोनाच्या काळात गोर गरिबांना अन्नछत्र उभारून उत्सव समितीने सेवा दिली. कोल्हापुर, सांगली, सातारा भागातील पुरग्रस्त कूटुंबाना संसारोपयोगी वस्तुचे वाटप केले. गरजू विद्यार्थिंना शैक्षणिक साहित्य वाटप केले. गतवर्षीच्या रक्तदान शिबीरामध्ये ८१२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली सामाजिक बांधीलकी जपली होती. यावर्षीदेखिल शिवजयंती उत्सव युवक समितीच्या वतीने १०३७ तरुण आणि महिलांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बैंक आणि आधार ब्लड बँकेच्यावतीने एकाच वेळी संगमनेर शहरात रंगारगल्ली, इंदिरानगर, मार्कंडेय मंदिर, दत्त मंदिर, बस स्थानक, मेडीकव्हर हॉस्पिटलसह तालुक्यामध्ये चंदनापूरी, करूले, तळेगाव, आश्वी, डिग्रस, पिंपळगाव कोंझीरा, घुलेवाडी, कासारादुमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. रखरखत्या उन्हातदेखील भरघोस प्रतिसाद देत नागरिकांनी आपली सामाजिक बांधीलकी जोपासत रक्तदान केले. याशिवाय २१ मार्चला होणाऱ्या शिवजयंती उत्सवावेळी सकाळी ८ वाजता शहर व उपनगरातुन मोटारसायकल रॅली, दुपारी १ वाजता शिवनेरीहुन येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत तसेच सायंकाळी ६ वाजता निघणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक भव्य मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे,पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, माज़ी नगरसेवक किशोर पवार, दिलीप पुंड, गजेंद्र अभंग, पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी भेट देवुन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
