वीरस्री आर्या नवलेचे महसूल मंत्र्यांकडून कौतुक !

प्रतिनिधी —

स्वतः अपघातात सापडलेली असताना देखील प्रसंगावधान दाखवत आईला गाडीखाली जाऊ न देता मृत्यूपासून वाचविणाऱ्या आर्या सुनील नवले या चिमुरडीला वीरस्री पुरस्काराने सन्मानित केले होते. संपूर्ण राज्यभर तिचे कौतुक करण्यात येत होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आर्या नवलेच्या या धाडसाचा सन्मान केला.

आर्या नवले हिने मोठ्या कठीण प्रसंगात दाखवलेले धैर्य असामान्य आहे. तिच्या धाडसी समयसुचतेमुळे अपघातातून तिच्या आईचे प्राण वाचले. केवळ आईच नाही, तर एक कुटुंब मोठ्या संकटातून वाचले. आर्याच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

काल संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या मंत्री थोरात यांना आर्या व तिच्या आईच्या अपघाताबाबत माहिती समजली. दोन वाहनांच्या मध्ये दुचाकी सापडून जीपने धक्का दिल्याने आर्या व तिची आई मनीषा रस्त्यावर खाली पडले. या जीवघेण्या अपघातात मनीषा या जीपच्या चाकाखाली सापडल्या होत्या. जीवन आणि मृत्यू यात काही सेकंदाचे अंतर होते. स्वतः आजारी असलेल्या आर्याने समयसूचकता दाखवत आईला चाकाखालून बाहेर ओढले. त्यामुळे आईचे प्राण वाचले, मात्र त्यांच्या हाताला गंभीर जखमा झाल्या.

एकूणच अपघाताची माहिती घेतल्यानंतर मंत्री थोरात यांनी जोर्वे येथे झालेल्या एका कार्यक्रमात आर्याचा सन्मान करत तिच्या धाडसाचे कौतुक केले.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, कांचन थोरात, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री थोरात म्हणाले की, इतक्‍या कमी वयात आर्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. तिचा कणखरपणा आणि समयसूचकतेमुळे तिच्या आईचे प्राण वाचू शकले. अशी मुले ही खरी देशाची संपत्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.

जीवघेण्या अपघातात मोठ्या धाडसाने आपल्या आईचे प्राण वाचवणाऱ्या आर्या नवले हिचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, आर्याचे वडील सुनील नवले उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!