संगमनेर नगर परिषदेला ५ कोटी ४० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश !

संगमनेर दूध संघाचे २ लाख ५० हजार रुपये केले जप्त !
प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
प्रतिनिधी —
प्रवरा नदीपात्रात संगमनेर नगरपरिषदेचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाची भरपाई म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगर परिषदेला ५ कोटी ४० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघा मुळे होणारे प्रदूषण उघडकीस आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दूध संघाचे २ लाख ५० हजार रुपये जप्त केले आहेत.

तसेच प्रवरा नदीत येणाऱ्या दूषित पाण्याबाबत संपूर्ण चौकशी करण्यात येईल असे आश्वासन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड यांनी विधानसभेत दिले आहे.
संगमनेर तालुक्यातील विविध कारखान्यांमुळे प्रवरा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत विविध प्रश्न उपस्थित केले होते. लक्षवेधी सूचना मांडली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेतली.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रात अनेक वर्षापासून साखर कारखाना, दूध संघ, हॉटेल, दवाखाने तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे प्रवरा नदीचे पाणी दूषित होत असल्याबाबतचे विविध प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केले होते.पर्यावरण विभागाकडून ही बाब खरी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेर नगरपरिषदेला दंड करण्यात आला असून दूध संघाची रक्कम जप्त केली आहे.

या प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या त्रासा विरुद्ध संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी काठच्या जोर्वे, कोल्हेवाडी, कनकापूर, कनोली, मनोली गावातील लोकांनी आंदोलन केले होते. तसेच पोलिस, प्रदूषण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत या विषयी जोरदार आवाज उठवला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत संगमनेर नगरपरिषद घरगुती सांडपाणी यंत्रणा उभारण्याबाबत व पर्यावरण नुकसान भरपाई का लादू नये याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संगमनेर नगरपरिषदेला पर्यावरण नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी ४० लाख रुपये दंड आकारला असून ही नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणी दरम्यान संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघाच्या डेअरी मधून पांढर्या रंगाच्या पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कारखाना परिसरात बाहेर चेंबरमध्ये होत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे दूध संघास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश दिले असून दूध संघाची २ लाख ५० हजार रुपये रक्कम प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त केली आहे.

शासनाच्या या कारवाईमुळे प्रवरा नदी मध्ये येणार्या प्रदूषित पाण्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत संबंधित संस्थांनी तातडीने कार्यवाही करुन प्रदूषित पाणी नदी पात्रात जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

नाटकी नदी गटारामध्ये बदलली आहे हेच गटार प्रवरेत सोडले आहे. तेथे गटाराचे पाणी स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका फिल्टरेशन व ते पिण्याच्या योग्य करून संगमनेर नगर पालिका कार्यालयाला पिण्यासाठी द्या.
संगमनेर नगरपरिषदेने तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्लांट सुरु करावा. या सांडपाण्याच्या पुनर्वापरामुळे पाण्याची बचत होऊ शकते. नगर परिषदेला भविष्यात केंद्र सरकारचे भरघोस बक्षिस मिळू शकते.
तसेच निळवंडे धरणातून पाईप लाईनव्दारे होणारा पाणीपुरवठा योग्य ठिकाणी फिल्टरेशन प्लांट उभारुन संगमनेरवासियांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.