महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कौळाणे येथे चांगले स्मारक व्हावे — आमदार डॉ. तांबे
अधिवेशनात केली आग्रहपूर्वक मागणी

प्रतिनिधी —
पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे राजश्री शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड महाराज यांचे अमूल्य व मोठे योगदान राहिले आहे. नाशिक जिल्ह्यातील कौळाणे या त्यांच्या जन्मगावी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे मोठे स्मारक व्हावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

मुंबई येथील अर्थ संकल्पीय अधिवेशनात कृषी, आदिवासी, शिक्षण शालेय, शिक्षण, रोजगार, दुग्ध यांचेसह विविध विषयावर बोलताना आमदार डॉ. तांबे यांनी या स्मारकाबाबतची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो. शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक होणे गरजेचे असून शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होऊ शकते. या क्षेत्राला योग्य दिशा देणारे सयाजीराव गायकवाड यांनी अत्यंत मोलाचे व भरीव योगदान राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी दिले आहे.

मागील पिढीतील अनेक नेते यांनी बडोदा येथील संस्थानातून शिक्षण घेऊन देश कार्यात सहभाग दिला आहे. सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कार्याची प्रेरणा सदैव पुढील पिढ्यांना होण्यासाठी त्यांच्या चांगले स्मारक त्यांचे जन्मगाव असलेले कौळाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे झाले पाहिजे अशी मागणी आमदार डॉ. तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

डॉ. तांबे यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून यापूर्वीही शासन स्तरावर स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या मागणीचे कौळाने व परिसरातील ग्रामस्थांकडून आमदार तांबे यांचे अभिनंदन होत आहे.
