अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र — आमदार राधाकृष्ण विखे पाटील
प्रतिनिधी —
महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र असून, कोणताही दिलासा अर्थसंकल्पातून मिळालेला नाही. राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असून, केवळ मोठमोठी स्वप्न दाखवली गेली आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘आघाडी सरकारच्या विकासाची पंचसुत्री बिघडलेलीच ‘असल्याची खोचक प्रतिक्रीया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, या सरकारने मागील दोन वर्षात केवळ घोषणा केल्या परंतू कृती शुन्य होती. आजच्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्वसामान्य घटकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, परंतू ती फोल ठरली. या अर्थसंकल्पातून सरकारने पुन्हा मोठी स्वप्न दाखवून बाराबलुतेदारांसह शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

नियमित कर्जफेड करणा-यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा या सरकारने दोन वर्षांपुर्वी केली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही पुन्हा आश्वासनच देवून शेतक-यांना फसवले आहे. याकडे लक्ष वेधून केंद्र सरकारच्या अनुदानातून सुरु असलेल्या कृषि योजना या सरकारच्या काळात बंद पडलेल्या असताना शेतकरी महिलांसाठी योजना जाहीर करुन पुन्हा एकदा मृगजळच दाखविले असल्याची टिका त्यांनी केली.

राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा या सरकारच्या काळात मोठा बट्याबोळ झाला. याबाबत ठाम भूमिका न मांडता या योजनेतूनच बाहेर पडण्याचे अर्थसंकल्पातून केलेले सुतोवाच म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण असून, शेतक-यांच्या जिवावर विमा कंपन्यांनी मोठा लाभ मिळविला यावर मात्र सरकार शब्दही काढायला तयार नाही.

एकीकडे मुद्रांकामध्ये कोट्यावधी रुपयांची सुट देण्याची घोषणा करताना शेतक-यांची वीजमाफी, एसटी कामगारांच्या बाबतीत अर्थसंकल्पामध्ये कोणतेही भाष्य अर्थमंत्र्यांनी केले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच राज्यातील विभागांच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतेच धोरण नसल्याने हा अर्थसंकल्प केवळ धनदांडगे, बिल्डर यांच्यासाठी धार्जीणा असल्याची प्रतिक्रीया आमदार विखे पाटील यांनी व्यक्त केली.
