संगमनेर तालुक्यातील गौण खनिज उत्खनन आणि बंद तलाठी कार्यालय विधानसभेत गाजले !

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमने – सामने !
प्रतिनिधी
तालुक्यातील आंबी दुमाला येथील तलाठी कार्यालय आठ वर्षांपासुन बंद असल्याच्या गंभीर घटनेकडे तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. हे कार्यालय नियमितपणे सुरु होईल आणि याभागातून गौण खनिजाच्या होत असलेल्या उत्खननाची चौकशी करण्याचे आश्वासन महसुल मंत्र्यांनी दिले.

अर्थसंकल्पीय आधिवेशनात आमदार विखे पाटील यांनी आंबी दुमाला तलाठी कार्यालय ८ वर्षांपासुन बंद असल्याने या भागातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या गावातील सर्व ग्रामस्थांना बोटा तलाठी कार्यालयात कामासाठी जावे लागते. विशेष म्हणजे या तलाठी कार्यालयास विज पुरवठा नसल्याने संगणकासह कोणतीच सुविधा नाही. असे या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठ्याने सांगितल्याची बाब विखे पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

आंबी दुमाला तलाठी कार्यालयात २०१३ साला पासुन ते कालपर्यंत कायमस्वरुपी तलाठीच काम पाहण्यासाठी नेमला गेलेला नाही. अतिरिक्त पदभारावरच या कार्यालयाचा पदभार सुरु असल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली. तलाठी कार्यालयात वीज नसेल तर डिजिटल दाखले देणार कुठून असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.

प्रारंभी महसुल विभागाचे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी या गावात तलाठी पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या ठिकाणच्या तलाठ्याच्या कडे देण्यात आला होता मात्र आता एस.बी. वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विखे पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडून तलाठीच जागेवर नसल्याने ग्रामस्थांना बोटा कार्यालयात जावून कागदपत्र मिळावावे लागतात, महसुल मंत्र्यांचा तालुका असल्याने हे सर्व माफ आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

तालुक्यात आणि पठार भागात होणाऱ्या गौण खनिज उत्खननावर बद्दल देखील विखे पाटील यांनी सवाल उपस्थित केला. माननीय सदस्य माझ्या तालुक्याची काळजी करतात हे ऐकून बरे वाटले असे म्हणून बाळासाहेब थोरात यांनी गौण खनिज वाहतुकीबाबत चौकशी करु असे सांगताच, स्वतंत्र चौकशीची गरज नाही, कारवाई करा अशी जोरदार मागणी विखे पाटील यांनी केली.

अर्थसंकल्पीय आधिवेशनामध्ये आमदार विखे पाटील यांनी आंबी दुमाला तलाठी कार्यालयाचा विषय उपस्थित केल्यानंतर महसुल प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने पुर्वीच्या तलाठी श्रीमती एस.बी. वाकचौरे यांना पुन्हा याच पदावर नियुक्त केल्याचा आदेश प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी काढला. विशेष म्हणजे एस.बी. वाकचौरे यांनी याच तलाठी कार्यालयातून वैद्यकीय कारणाने आपली सेवा अकोले तालुक्यात वर्ग केली होती. त्यांनाच पुन्हा आता या तलाठी कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे.
