सुरज जाधव याच्या आत्महत्येतून आघाडी सरकार धडा घेणार का ? —       आमदार विखे पाटील यांचा सवाल 

प्रतिनिधी —

वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही, असं सुरज मृत्यूपूर्वी म्हणाला होता. या दुर्दैवी घटनेतून आघाडी सरकार काही धडा घेणार आहे का ?  राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? असा प्रश्न माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीत वाटेदार असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी भले मोठे आश्वासनं दिले होते. दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी मिळेल, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करू, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊ, पण राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही कमी झालेल्या नाहीत, २०२० मध्ये महाराष्ट्रात एकूण २ हजार ५७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२१ या ११ महिन्यांत काळात २ हजार ७० शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. आता तर चक्क वीज तोडणीला कंटाळून सुरज जाधवने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ऊर्जा मंत्रालयाने तात्काळ हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आशी मागणी ठरून विखे पाटील यांनी वीज तोडणी थांबवावी, अशी मागणी केली आहे.

महावितरण कर्जबाजारी झाल्याचे सांगत राज्यात १६ विभागा अंतर्गत ४४ सर्कल अधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वेठीस धरला जातोय. सततचा दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, गडगडलेले शेतमालाचे दर, दुधाचा घसरलेला दर, जनावरांचा चारा, शेतीची मशागत अशा चहुबाजूनी राज्यातील बळीराजा अडचणीत सापडला असून, स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या भविष्यासाठी तो दिवसरात्र झगडतोय. तरीही, शेतातील पिकाला पाण्याची जोड मिळाल्यास त्याला या संकटातून बाहेर निघण्यास मदतच होणार आहे. ऊर्जा विभागाने वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

 

RRAJA VARAT

One thought on “सुरज जाधव याच्या आत्महत्येतून आघाडी सरकार धडा घेणार का ? —       आमदार विखे पाटील यांचा सवाल ”
  1. शेतक-यांना आता केंद्र सरकारने सोलर पाॅवर प्लॅन्टसाठी शंभर टक्के सबसिडी द्यायला सुरुवात केली पाहिजे फक्त विस टक्के इतरांना ठिक आहे.
    विखे पावलांनी त्या साठी मोदींकडे साकडे घालायला हवे होते त्या ऐवजी महाविकास आघाडी सरकार वर ते निशाणा साधत आहेत याहून मोठे दुर्दैव काय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!