ग्रामसभेची दिशाभूल करीत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अपात्र ठरविले ! 

सारोळे पठार ग्रामपंचायतीचा आरोप

तर….. सरकारी कामात अडथळा केला म्हणून संबंधितांवर गुन्हे दाखल करू —  गटविकास अधिकारी

प्रतिनिधी —

 

ग्रामसभेची दिशाभूल करत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले असल्याचा आरोप संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या गावच्या ग्रामपंचायतीने केला आहे.

मात्र या गावातील सर्वेक्षण पूर्णपणे नियमाप्रमाणे करण्यात आले असून तसा अहवाल ग्रामसभेत देण्यात आलेला आहे. ग्रामसभेतील ठराव सरपंचांनी त्यांच्या स्वाक्षरीसह पंचायत समितीला दिलेला आहे. असे असतानाही देखील असे आरोप होत असतील तर आम्ही त्याची पुन्हा चौकशी करू. मात्र हे जर खोटेपणाने व खोडसाळपणे जर केले जात असेल तर सरकारी कामात अडथळा म्हणून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिला आहे.

पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पंचायत समितीने अपात्र ठरविले असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. या योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या ९२ लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मुळात या प्रकरणी पंचायत समितीकडून कुठल्याही प्रकारे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. फक्त पाच सहा लोकांच्या घरी जाऊन पाहणी करून १५५ लाभार्थ्यांची नावे दिली आहेत. हा सर्वे मनमानी पद्धतीने बनवलेला आहे व सदर सर्वेतील नावे ही ग्रामसभेत न वाचता जुनी मंजूर यादी वाचून दाखवत ग्रामस्थांची व जनतेची दिशाभूल करण्यात आली असल्याची तक्रार सारोळे पठार ग्रामस्थांची आहे.

ग्राम सभेनंतर कुठलीही यादी प्रसिद्ध करण्यात आली नसून. कुठलेही तक्रार अर्ज स्वीकारले गेले नाहीत. प्रत्येक वेळी ग्रामसेवकाला याबद्दल विचारणा केली असता सर्व घरकुल मंजूर करण्यात आले आहेत असे खोटे सांगून दिशाभूल करण्यात आली आहे.

सदर ग्रामसभेच्या प्रोसिडिंग बुक मध्ये आमच्या पदाधिकाऱ्यां पैकी (सरपंच, उपसरपंच आणि सदस्य) कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत. कुणालाही कल्पना दिलेली नाही. तरी सदर प्रोसिडिंगच्या आधारे व चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे पंचायत समितीची दिशाभूल करून आमच्या गावातील पात्र लोकांना अपात्र करण्यात आलेले आहे. त्यासाठी आमच्या गावात फेर सर्वेक्षण करून सत्य परिस्थिती समोर यावी अशी विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनावर सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सारोळे पठार मध्ये सर्वे करण्यात आला आहे. चार विभागाच्या चार व्यक्तींनी हा सर्वे केला आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विविध कार्यकारी सोसायटी आणि केंद्रप्रमुख शिक्षण विभाग. हा संपूर्ण सर्वे ग्राम सभेत मांडण्यात आला. या सर्वेला ग्राम सभेत मान्यता देण्यात आली. सरपंच यांच्या स्वाक्षरीने ग्रामसभेचा ठराव आमच्याकडे आला. एवढे नियमाप्रमाणे सर्व केले आहे. आता ग्रामसभा होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला. त्यानंतर अचानक अशाप्रकारे ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गावांमध्ये जर काही आपापसातील राजकीय वाद असतील. त्यामुळे काही प्रश्न उद्भवला असेल याचीही शक्यता आहे. मात्र तरीही त्यांच्या तक्रारीवरून आम्ही पुन्हा चौकशी करू. मात्र एकदम मोठ्या संख्येने हा सर्वे करता येणार नाही. ज्यांची नावे वगळली गेली आहेत अशी स्पष्ट लाभार्थी असलेल्यांची नावे त्यांनी द्यावीत पुन्हा सर्वे केला जाईल. यात मात्र जर काही खोटे आढळून आले तर मात्र शासनाच्या कामात अडथळा निर्माण केला म्हणून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.

अनिल नागणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमनेर.

RRAJA VARAT

One thought on “ग्रामसभेची दिशाभूल करीत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अपात्र ठरविले !  सारोळे पठार ग्रामपंचायतीचा आरोप”
  1. किती वाईट्ट प्रवृत्ती आहे ग्रामपंचायत आधिकारी लोकांना फसवणूक करत आहेत. गरीबांना घरापासून वंचित ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!