शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच — किसान सभा

अधिक तरतुदींची अपेक्षा होती.

प्रतिनिधी —

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली होती. कोविडमुळे या घोषणेची अंमलबजावणी झाली नव्हती. अर्थसंकल्पात ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होईल याचे सूतोवाच झाले. किसान सभेच्या वतीने या घोषणेचे स्वागत.

महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत २ लाखांच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना एक रकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत २ लाखांपर्यंतच्या कर्ज फेडीची जबाबदारी राज्य सरकारने घेतली होती. मात्र कोविडमुळे या निर्णयाचीही अंमलबजावणी झाली नव्हती. अर्थसंकल्पात याबाबत सकारात्मक घोषणा अपेक्षित होती. मात्र तसे झाले नाही ही निराशाजनक बाब आहे.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ६० हजार नवीन वीज कनेक्शन्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला थकीत वीजबिल वसुलीसाठी सरकारच्या संमतीने हजारो शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन्स तोडले जात आहेत. शेती क्षेत्रातील आर्थिक संकट पाहता अर्थसंकल्पात वीज बिल माफीबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही.

वाढत्या महागाईमुळे शेततळे बनविण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थसंकल्पात शेततळे अनुदानाची रक्कम वाढवून ७५ हजार करण्यात आली आहे. मात्र महागाई व शेततळे उभारणीचा खर्च पहाता ही वाढ पुरेशी नाही. शेततळ्यासाठी किमान दीड लाख रुपये देणे आवश्यक आहे.

पीक विमा योजनेत गंभीर त्रुटी आहेत व योजना शेतकऱ्यांच्या ऐवजी कंपन्यांना लाभाची ठरत आहे. सरकारने ही बाब लक्षात घेता पीक विमा योजनेबाबत ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने याबाबत केवळ वेळकाढुपणा केला आहे.

सिंचनासाठी १३ हजार ५५२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून येत्या २ वर्षात राज्यातील १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. सिंचन प्रकल्पांसाठी केलेली ही तरतूद पाहता पुढील दोन वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या शक्यता नाहीत. अधिक तरतूद अपेक्षित आहे.

राज्यात १ लाख हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले याचे स्वागत आहे. मात्र दूध उत्पादक शेतकरी दुधाला एफ.आर.पी व रेव्हेन्यू शेअरींगचे संरक्षण मिळावे यासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. दूध उत्पादकांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. अशा पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांच्या एफ.आर.पी व रेव्हेन्यू शेअरिंग सारख्या मूलभूत मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. दूध उत्पादकांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे.

बाजार समित्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार हमी योजना, सौर ऊर्जा बाबत काही घोषणा झाल्या असल्या तरी एकंदरीत शेती क्षेत्रासमोरील संकट पाहता याबाबत अधिक आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता होती. २०२०-२१ साली राज्याचा कृषी विकासाचा दर ११.७ टक्के होता. २०२१-२२ च्या पाहणी अहवालामध्ये तो ४.४ टक्के पर्यंत खाली जाईल असा अंदाज बांधण्यात आलेला आहे.

शेती क्षेत्रासाठी आणि एकंदरीतच राज्याच्या आर्थिक क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. २०२०-२१ च्या तुलनेत उद्योग आणि सेवा क्षेत्र मजबुतीने पुढे येताना दिसत आहे. तुलनेने शेती क्षेत्र मागे पडत आहे. ५५ टक्के जनतेच्या रोजीरोटीचे साधन असणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी म्हणूनच अधिक आर्थिक तरतूद होण्याची आवश्यकता होती. अशी प्रतिक्रिया डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस किसान सभा यानी दीली आहे.

RRAJA VARAT

2 thoughts on “शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच — किसान सभा”
  1. अर्थसंकल्प आणि शेती
    शेतीला उद्योगाचा दर्जा केंद्र आणि राज्य सरकारांनी मान्यता देणे महत्त्वाचे आहे.
    केंद्र सरकारने तीनही कायदे रद्द केले व शेतक-यांची मागणी मान्य केली आहे.
    शेतीला जमिन आणि पाणी या व्यतिरिक्त सुर्यप्रकाश देखिल महत्त्वाचा घटक आहे. तिन्ही गोष्टी पैकी एकही गोष्ट कमी पडली तरी पिक उगवतच नाही. पाणी आणि सुर्यप्रकाश निसर्गाचा चमत्कार असतो. वेळी अवेळी पाऊस, गारपिट हि धोक्याची घंटा आहे. तर जमिनीचा तुकडा हा शेतकरी व सरकार ह्या दोघांची मालकी हक्क प्रस्थापित करणे हे सर्वात महत्वाचे आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी शेती आणि युद्ध असे दोन्ही ठिकाणी काम करायचे. युद्धात काम करणा-या शेतक-याला महसूल सवलत छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे हक्क म्हणून. युद्ध नसलेल्या काळात शेतकरी शेती कसायचा व गरजेपुरते अन्नधान्याची स्वतः साठवून वर्षभर पुरवून खायचा. उरलेले धान्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सैनिकांना जेवण पुरविण्यासाठी सरकारी कोठारात ठेवला जात असे. युद्ध झालेच नाही तर सर्व सैनिक फक्त किल्ल्यावर बंदोबस्त करण्यासाठी वापरले जायचे. किल्लेदार अन्नधान्याची व प्यायच्या पाण्याची साठवण कोठारात व तळ्यात पाणी साठवून वर्षभर पुरवून वापर करायचा. किल्लेदार फक्त युद्धजण्य परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी पुरेसा व किल्ल्याला शत्रूचा वेढा पडला तर असलेल्या अन्न धान्य साठा व प्यायच्या पाण्याची जपून वापरायचा. सहा महिने ते कधी कधी वर्ष भरही शत्रूचा किल्ल्याला वेढा देऊन किल्लेदार व किल्ल्यावर रहात असलेल्या प्रत्येकाला रेशन द्यायचा त्या साठी पैसे द्यायला लागत नसायचे.
    आताच्या काळात आजची सरकारे तशीच पद्धत वापरतात. युद्ध नसते तेव्हा विकत घेऊन सैनिक आपली सोय करतो.
    आता प्रश्न असा आहे कि शेतकरी शेती साठी इलेक्ट्रिक पंप वापरतो आहे. सरकार त्यासाठी विज स्वस्त दरात पुरवते

    1. समजलं नाही आपल्याला काय सांगायचं आहे ते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!