आरोग्याविषयी महिलांनी जागरूक असणे गरजेचे —
डॉ. संकेत मेहता

मालपाणी इंडस्ट्रीत महिला दिनानिमित्त आरोग्यविषयक व्याख्यान
प्रतिनिधी —
” प्रत्येक परिवारातील महिला ही त्या कुटुंबाचा आधारस्तंभ असते तिच्या आरोग्यावर त्या परिवाराची प्रकृती आणि प्रगती अवलंबून असते म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्याविषयी अतिशय जागरूक असणे गरजेचे आहे ” असे मत संगमनेर मधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संकेत मेहता यांनी येथे व्यक्त केले. मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून मालपाणी इंडस्ट्रियल पार्क येथे आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. श्वेता मेहता, मालपाणी उद्योग समूहाचे व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी आहेर, रवींद्र कानडे, आदी उपस्थित होते.
” सध्याचे जीवन अत्यंत धावपळीचे धकाधकीचे आणि तणावपूर्ण झालेले आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक महिला स्वतःच्या प्रकृतीकडे हवे तितके लक्ष पुरवीत नाहीत. परिणामी त्यांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात व अनेक आजार शरीरामध्ये मुक्कामास येतात. परिवारातील महिलेचे आजारपण संपूर्ण परिवाराची कसोटी पाहणारे ठरते. त्यामुळे कितीही धावपळीचे वेळापत्रक असले तरी दररोज स्वतःसाठी, स्वतःच्या प्रकृतीसाठी एक तास देण्याचा निर्णय प्रत्येक महिलेने घेतला पाहिजे. सुदृढ महिला सुदृढ परिवार हे साधे सोपे समीकरण प्रत्येक महिलेने लक्षात घेतले पाहिजे ” असे आग्रही मत डॉ. मेहता यांनी मांडले.

डॉ. श्वेता मेहता यांनी यावेळी उपस्थित महिलांना ‘दातांचे आरोग्य’ या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. उपस्थित महिलांनी मेहता डॉक्टरांना तब्येती बाबत अनेक प्रश्न विचारून शंकासमाधान केले.
मालपाणी उद्योग समुहच्या वतीने मेहता दाम्पत्याचा सत्कार घोलप यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत -प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अर्चना शुक्ला -मिश्रा यांनी केले. मालपाणी उद्योग समूहातील सर्व कामगार महिला भगिनी, व स्टाफ मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वर्षभरात सर्वाधिक हजेरी असणाऱ्या व उत्पादनक्षमतेत विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या कामगार महिलांना विशेष पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्व उपस्थित महिलांना उद्योग समूहाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.

संतोष राऊत, राहुल शेरमाळे, मंगेश उनवणे, सौ शुक्ला यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजनाचे सांघिक बक्षीस अर्चना शुक्ला यांनी टीमच्या वतीने स्वीकारले. महिला दिनाचे औचित्य साधून या वेळी उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, छोटा मासा -मोठा मासा असे गमतीशीर खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित महिलांनी सध्या गाजत असलेल्या श्रीवल्ली या सुपरहिट गाण्याच्या तालावर सामूहिक नृत्याचा आनंद लुटला.
