नगरच्या संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांचे वृद्ध आदिवासी महिलांना तात्काळ पेन्शन देण्याचे आदेश !

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आस्थेवाईकपणे साधला संवाद
प्रतिनिधी —
वृत्तपत्रांमधून बातमी समजल्यानंतर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तात्काळ पावले उचलत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला थेट अकोले गाठले आणि बांगरवाडी येथील वृद्ध महिलांशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांना तात्काळ पेन्शन देण्याचा आदेश दिला आहे.

जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडून या वृद्ध महिलांना महिला दिनाची ही अनोखी भेट म्हणावी लागेल.
राहीबाई भांगरे व त्यांची सावत्र मुलगी सीताबाई सुपे या वृध्द मायलेकी अनेक दिवसांपासून हक्काच्या पेन्शन पासून वंचित होत्या. याबाबत वृत्तपत्रातून माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले अचानकपणे बांगरवाडी येथे त्यांची भेट घेत आपुलकीने व आस्थेवाईकपणे संवाद साधला. आपुलकीने साधलेल्या संवादामुळे राहीबाई भांगरेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची संवेदनशीलता आज जिल्ह्याला पाहण्यास मिळाले आहे. यावेळी अकोले तहसीलदार सतिश थिटे, नायब तहसीलदार गणेश माळवे उपस्थित होते. याप्रंगी राहीबाई यांची तब्येत कशी आहे ? घरकुल हवे आहे का ? असे प्रश्न करत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. दस्तुरखुद जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या अनपेक्षित भेटीनं व विचारपूस केल्यानं राहीबाईंचा हुंदका दाटून आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी बांगरवाडी येथील भेटीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनबाबत अकोले तालुका प्रशासनाची बैठक घेतली. तहसील कार्यालयाने यापुढे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत आहे का ? याची नियमित चौकशी करावी. ज्येष्ठ नागरिकांची परस्पर पेन्शन लाटणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा. यापुढे ज्येष्ठांची फसवणूक होणार नाही. यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी. असा आदेश यावेळी दिला.

