रामायण – महाभारताच्या काळातही स्त्रीचे दमनच झाले !

  — दुर्गाताई तांबे

संगमनेर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी —

 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जशी एक स्त्री उभी असते तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागेही एक स्त्रीच उभी असते. पूर्वीपासून महिलावर अन्याय होत आला आहे. अगदी कमी वयात लग्न करण्याची प्रथा अन्यायकारकच होती. रामायण – महाभारताच्या काळातही स्त्रीचे दमनच झाले. म्हणून भूतकाळातले दोष दाखविण्यापेक्षा आधुनिक काळामध्ये स्त्रियांनी आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे. स्त्री समर्थपणे उभी राहिली तर सामाजिक क्रांती निश्चित होईल. असे प्रतिपादन संगमनेर नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले.

 

संगमनेर महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, संगमनेर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन, लैगिंक छळ प्रतिबंध दक्षता समिती व महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनाच्या विशेष पर्वामध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डाॅ. अरुण गायकवाड होते.

व्यासपीठावर चेतना डंग, आशिष डंग, सुनीता डंग, डॉ.सीमा बोरगावे, वनस्पतीशास्र विभागप्रमुख डॉ. संगीत जाधव, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. राजश्री ओझा, प्रा. ललिता मालुसरे आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या कि, स्त्रियांनी मिळालेला आयुष्यातील वेळ विनाकारण वाया घालवण्यापेक्षा चांगले वाचन करणे गरजेचे आहे. स्त्रिया जर संस्कारशील झाल्या तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवाचा नारा दिला पाहिजे. निसर्ग संवर्धनाकडे, वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जागतिक महिला दिन साजरा करून, स्त्रियांचे हक्क मिळणार नाहीत तर स्त्रीनेच आपल्या हक्काची जाणीव आपल्यामध्ये निर्माण करून घेतली पाहिजे. महिलांनी ठरवले तर घरात आर्थिक नियोजन करून कुटुंबात चांगला आदर्श त्या निर्माण करू शकतात. मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर त्या घेऊन जाऊ शकतात.

ज्या ज्या वेळी समाजात स्त्री समर्थपणे उभी राहिली आहे. त्या त्या वेळी समाजात निश्चितच क्रांती झाली आहे. मग ती राष्ट्रमाता जिजाऊ च्या रूपाने असो, झाशीच्या राणीच्या किंवा सावित्रीबाई फुले यांच्या रुपाने असो इतिहासाची पाने बदलण्याचे काम या असामान्य स्त्रियांनी करून दाखवले आहे.

चेतना डंग आपल्या मनोगतात म्हणाल्या की, इतिहासाने चांगला इतिहास घडविणाऱ्या अनेक स्त्रियासुद्धा दिल्या आहेत. सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, पी टी उषा यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असेच आहे. आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असो महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा तरच जीवनात यशस्वी होता येते.

 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य अरुण गायकवाड म्हणाले की, कोविंड १९ चा प्रभाव आता कमी होत आहे. आता आपण ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात कार्यक्रम घेत आहोत. याचा मनस्वी आनंदच होत आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी भविष्याचा वेध घेऊन, मार्गक्रमण करण्याची गरज तसेच स्वकर्तृत्वावर उत्तुंग भरारी घेणे ही काळाची गरज बनली आहे. सध्याच्या काळात पारंपारिक शिक्षणाचा परीघ बदलत आहे. येणाऱ्या भावी काळात विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकविण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. भविष्यकाळात प्रत्येक विद्यार्थी तंत्रज्ञानाशी जोडला जाईल. महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्ततेमुळे भविष्यकाळातही गरजेवर आधारित अभ्यासक्रमाची निर्मिती आपण करणार आहोत. शिक्षणातून समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमामध्ये संगमनेर महाविद्यालय कार्यरत असणाऱ्या महिला प्राध्यापिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ. राजेश्वरी ओझा यांनी केले सूत्रसंचालन प्रा. गौरी मोरे व प्रा.रेणुका भापकर यांनी केले. तर आभार प्रा.ललिता मालुसरे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात तुळशीचे रोप व विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड्स बाॅलचे वाटप उपस्थितांना करण्यात आले.

कार्यक्रमासाठी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर महिला सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

One thought on “रामायण – महाभारताच्या काळातही स्त्रीचे दमनच झाले ! — दुर्गाताई तांबे”
  1. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, छ.शिवाजी महाराजांची आई जीजामाता, छ.संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाईच्या,शाहु महाराजांची आई व राणी ताराबाई, छ. संभाजी महाराज यांची बहिण अशा अनेक स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या गैरहजरीत प्रचंड मोठी कामं केली आहेत. अगदी अलीकडेच काळात पंतप्रधान इंदिरा गांधींनी, पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके, इंग्लंड च्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर, जर्मनीच्या चॅन्सेलरबाई, इझ्राईलच्या पंतप्रधान बाई, बंगालची वाघिन ममता बॅनर्जी, तामिळनाडू ची मुख्यमंत्री जयललिताबाई अजूनही ब-याच महिलांची कारागिरी ऐकण्यासारखी व पुरुषांनाहीआदर्श घेण्याइतकी मोठी व आदर्श आहे.
    भारताची आर्मी मेडिकल कोअरची प्रमुख जनरल एक महाराष्ट्रीय महिला आहे
    यादी बरीच मोठी आहे. वेळे अभावी मी ती माहिती इथे देत नाही.
    प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक यशस्वी पुरष असतो उदाहरणार्थ गोव्याची मुख्यमंत्री काकोडकर बाई, बंगला देशची पंतप्रधान हसीना, पाकिस्तानी महिला पंतप्रधान बेनझिर भुट्टो, ईंग्लंडची महाराणी एलिझाबेथ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!