रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी संगमनेरात महिलांचा “कॅन्डल मार्च!”

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शांततेचे आवाहन !

प्रतिनिधी —

युद्ध नको – शांती हवी, युद्ध थांबवा, जग वाचवा, पूतीन गो बॅक अशा घोषणा देत संगमनेरातील शेकडो महिलांनी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथम कॅन्डल मार्च काढून युक्रेन- रशिया युद्ध थांबवत जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी आवाहन केले आहे.

संगमनेर बसस्थानक येथून जयहिंद लोकचळवळ व संगमनेर मधील विविध सेवाभावी संस्था, बचत गट, शिक्षिका, डॉक्टर, वकील, गृहिणी, इंजिनीयर भगिनी यांच्या वतीने महिलांचा कॅन्डल मार्च झाला. यावेळी दुर्गाताई तांबे, शरयु देशमुख, ॲड. निषा शिवूरकर, दिपाली पानसरे यांसह महिला उपस्थित होत्या.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींनी शांततेत एकत्र येत संगमनेर बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चावडी, मेन रोड, गवंडीपुरा, लींक रोड, नवीन नगर रोड असा मार्च काढून नवीन नगर रोड येथे युक्रेन रशिया युद्धाचा निषेध केला.

यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दिला आहे. जगामध्ये शांतता नांदण्यासाठी युद्ध नको आहे. युक्रेन आणि रशिया हे वर्चस्ववादातून जगावर युद्ध लादत आहेत. हे अत्यंत भयावह आहे. आत्ताच कोरोनाच्या संकटातून जग सावरत असताना नवे युद्धाचे ढग जगासमोर दाटले आहेत. ते तातडीने थांबवावे. संपूर्ण मानव जातीला शांततेतून प्रगती हवी आहे. यामध्ये कोणताही वर्चस्ववाद न करता सर्व देशांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजे.

सध्या सुरू असलेल्या युक्रेन रशिया युद्धामध्ये हजारो निष्पाप लोक मारले गेले आहेत. हे अत्यंत दुःखदायक आहे. संपूर्ण भारतात संगमनेर मधून प्रथम या युद्धाचा  कॅण्डल मार्च ने निषेध करण्यात आला आहे. तरी तातडीने या दोन्ही देशांनी युद्ध थांबवले पाहिजे असे आवाहन करताना हे युद्ध थांबविण्यासाठी जगातील सर्व देशांनी पुढाकार घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

ॲड. निशा शिवूरकर म्हणाल्या की, संगमनेरने कायम राज्याला दिशा दिली आहे. आज या आंदोलनाची महाराष्ट्रातून सर्वप्रथम सुरुवात येथे होत आहे. युद्धातून मनुष्यहानी होते आहे. आज झालेली प्रगती अनेक दशकांची आहे. मात्र विध्वंस हा काही क्षणांचा आहे. जग टिकवायचे असेल, मानव धर्म टिकवायचा असेल तर या युद्धाचा निषेध केलाच पाहिजे. संगमनेरमधील शेकडो महिला रस्त्यावर एकवटल्या आहेत. महिला दिनानिमित्त मोठी ताकत जगाला कळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.. यावेळी  युद्ध नको, बुद्ध हवा..युद्ध नको, शांती हवी अशा घोषणा महिलांनी दिल्या.

मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या या कॅण्डल मार्चमध्ये छोट्या-छोट्या विद्यार्थिनींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, राजमाता जिजाऊ, मदर तेरेसा, इंदिरा गांधी या अशा विविध राष्ट्रपुरुष अशा महिलांच्या वेशभूषा करून सध्या सुरू असलेल्या युद्धाचा निषेध केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!