अकोलेत बिबट्या पिंजर्यात !
प्रतिनिधी —
अकोले शहरा पासून जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिरा जवळ उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या शेतातील उसात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तीन वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मी परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनी वनखात्या कडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने आठवडा भरा पूर्वी महालक्ष्मी मंदिरा जवळ उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या शेतातील सर्व्हे नंबर ७५ मधील उसात पिंजरा लावला होता. आज सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला व वाऱ्या सारखी ही बातमी परिसरात समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच वनखात्याचे वनपरिमंडळ अधिकारी विठ्ठल पारधी, वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे व सुनील कुक्कडवाल, वनकर्मचारी उत्तम पोखरकर , सोमनाथ पथवे यांनी घटनास्थळी येत संबंधित बिबट्याची रवानगी मनोहरपूर रोपवाटिकेत केली.

दरम्यान या परिसरात अजूनही एक दोन बिबट्यांचे वास्तव्य असल्याने वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व नगरसेविका सौ. शितल अमोल वैद्य व सौ.कविता परशुराम शेळके यांनी वन विभागाकडे केली आहे.
