महिलेला ठार केलेली नरभक्षक बिबट मादी जेरबंद !
महिलेच्या कुटुंबियांस वन विभागाकडून पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान

प्रतिनिधी —
तालुक्यातील मेंढवण शिवारातील कर्थळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांस वन विभागाकडून पाच लाख रुपयांचा धनादेश आमदार डॉ. सुधीर तांबे व उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. उर्वरीत दहा लाख रुपयांचा धनादेशही लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी बुधवारी (दि.२) पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास नरभक्षक बिबट मादी पिंजर्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

सुमारे दहा दिवसांपूर्वी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मका शेतीला पाणी भरण्यास गेलेल्या हिराबाई एकनाथ बढे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर शासन निर्णयानुसार मयताच्या कुटुंबास तातडीची आर्थिक मदत म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश आमदार डॉ. सुधीर तांबे व उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. याचबरोबर उर्वरीत १० लाख रुपयांचा धनादेशही लवकरात लवकर वारसांना प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय वनाधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भाग दोनचे वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल पी. जे. पुंड, वनरक्षक एस. एम. पारधी, एस. बी. सोनवणे, व्ही. आय. जारवाल, वाहन चालक आर. आर. पडवळे, एस. बी. बोर्हाडे, वन कर्मचारी किसन काळे, अशोक गिते व ग्रामस्थांनी अहोरात्र गस्त करून नागरिकांमध्ये जनजागृती केली.

तर बुधवारी (दि.२) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास बाबुलाल पठाण यांच्या वस्तीजवळ लावलेल्या पिंजर्यात भक्ष्याच्या शोधात आलेली बिबट मादी पिंजर्यात जेरबंद झाली आहे.
