सामर्थ्यवान व समृद्ध भारताच्या उभारणीत काँग्रेसचे मोठे योगदान –

भाजपा सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे
– एच के पाटील

काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल — महसूल मंत्री थोरात

शिर्डीत उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी —

स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी केले असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करेल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे विधिमंडळनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

शिर्डी कोपरगाव रोड वरील साई सृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेसचे सचिव बी. एम. संदीप, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉ. शोभाताई बच्छाव, उल्हास पाटील, शरद आहेर, हेमलता पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नाशिकचे डॉ. तुषार शेवाळे, शरद आहेर, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, संदीप भैय्यासाहेब पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कीर्ती वळवी, अनुराधा नागवडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, उपाध्यक्ष भाई नगराळे, राहुल साळवे, किरण काळे, अनिल आहेर, दुर्गाताई तांबे यांच्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

एच.के. पाटील म्हणाले की, काँग्रेसला मोठी परंपरा आहे .स्वातंत्र्यप्राप्तीसह स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या माध्यमातून देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र मागील सात वर्षापूर्वी आलेले भाजपाचे सरकार सातत्याने खोटे बोलत आहेत .पंतप्रधान हे खोटे बोलून देश जनतेची दिशाभूल करत आहेत. कोणतेही काम न करता फक्त जाहिरातबाजी करणाऱ्या या लोकांनी पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्या ची खोटी आश्वासने दिली. या उलट देशात तीन काळे कायदे लावून शेतकरी विरोधी निर्णय घेतला. भाजपा पासून देशाला वाचवण्याकरता काँग्रेस हाच सक्षम पर्याय असून काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा पक्ष आहे. डिजिटल नोंदणीच्या माध्यमातून तरुणांना यामध्ये मोठी संधी असून महाराष्ट्रातून एक कोटी डिजिटल नोंदी सभासद करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीन काळया कायद्याविरोधात राबवलेली एक कोटी स्वाक्षरी मोहीम अत्यंत यशस्वी झाली होती. थोरात लोकाभिमुख असल्याचेही पाटील म्हणाले.

तर माजी मंत्री पल्लम राजू म्हणाले की , काम कमी आणि जाहिरात ज्यादा असलेल्या भाजपा सरकारने देशवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. कोरोना संकटात केंद्र सरकार पूर्णपणे असफल ठरले असून भारतामध्ये मोठी आर्थिक मंदी आली आहे. राज्यांमध्ये सूड बुद्धीने महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध काम केले जात आहे. या सरकारला अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव असून शेतकरी, कामगार, कष्टकरी या सर्वांच्या विरोधी असणारा या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात बाळासाहेब थोरात यांना मोठी ताकद द्यावी असे ते म्हणाले.

तर महसूल मंत्री थोरात म्हणाले की जाती धर्माच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेले भाजपा सरकार हे राज्य अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. महा विकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच २ लाखांची कर्जमाफी दिली. अनेक संकटामध्ये जनतेच्या पाठीशी उभे राहिले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने भारत देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगाराचा कायदा, अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य कायदा, शिक्षणाचा कायदा हे महत्त्वाचे कायदे दिले. काँग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. इंदिरा गांधींच्या काळात ही पक्षाला संघर्ष करावा लागला मात्र पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली. आता पक्षासाठी मंदी असली तरी नव्या कार्यकर्त्यांसाठी ही मोठी संधी आहे. येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी काम करा.
काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवणे अत्यंत गरजेचे असून गोरगरीब माणूस ही खरी काँग्रेसची ताकद आहे .त्याला सोबत घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात जोरदार  कम बॅक करणार असल्याचे ते म्हणाले.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, डिजिटल नोंदणी अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मोठी संधी आहे. प्रियंका गांधी यांनी लडकी हु लड सकती हु हे अभियान सुरू केले असून महिलांना काँग्रेस पक्षामध्ये मोठी संधी असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, उल्हास दादा पाटील, डिजिटल नोंदणी अभियानाचे समन्वयक भाई नगराळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
उत्कर्षा रुपवते, डॉ एकनाथ गोंदकर, करण ससाने, सचिन गुजर, प्रा ज्ञानेश्वर गायकवाड, हेमंत ओगले, काँग्रेस प्रदेशचे सचिव सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले सूत्रसंचालन  नामदेव कहांडळ यांनी केले तर धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा निहाय विविध पदाधिकाऱ्यांचा आढावाही मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!