जन्मतः अंध पांडुरंग पाटलांनी केला हरिहर किल्ला सर..
सर्पमित्र व गिर्यारोहक सचिन गिरी यांची अनमोल साथ

प्रतिनिधी —
दुर्गभ्रमंती आणि पर्यटनाची ओढ माणसाला कुठे कुठे फिरवेल हे सांगता येत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना भुरळ घालणारे कळसुबाई हरिषचंद्र गड अभयारण्य हे सर्वश्रुत आहे. या पट्ट्यामध्ये असणाऱ्या विविध गडांवर सफर करण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

शरीराने धडधाकट असणाऱ्या व्यक्ती सुद्धा कधीकधी या उंच कातळ कड्यांवर जाण्यास कंटाळा करतात. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा धडधाकट तरुण मुले कधीकधी कुरकुर करतात. मात्र शरीराने अपंग असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हे गड-किल्ले सर केले आहेत. अशाच एका जन्मत: अंधत्व असलेल्या तरुणाने नुकताच हरिहर किल्ला सर केला आहे.

संगमनेर येथील सर्पमित्र आणि प्रसिद्ध गिर्यारोहक सचिन गिरी यांनी अंध असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पांडुरंग पाटील या तरुणाला नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाची यशस्वी सफर नुकतीच घडवली आहे. पांडुरंग पाटील यांनी हरिहर हा किल्ला गिरी यांच्या मदतीने सर केला आहे.

या आधी सुद्धा गिरी यांच्या सोबतीने दोन वेळा कळसुबाई शिखर, दोन वेळा हरिश्चंद्रगडावर आणि दोन वेळा रतनगडावर देखील पांडुरंग पाटील यांनी सफर केली आहे.
परंतु हरिहर किल्ल्यावर ते प्रथमच आले होते.
नुकताच त्यांनी हा धाडसी पराक्रम केला असून काही दिवसांपूर्वी ते हरिहर गडावर जाऊन आले. संगमनेर येथून सकाळी निघाल्यानंतर साडेनऊ वाजता सकाळी त्यांनी हरिहर गड चढाईला सुरुवात केली. साधारण दिड ते पावणेदोन तासात ते गडाच्या माथ्यावर पोहोचले व थोडी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा ते गडाखाली आले.

जन्मतः अंध असून देखील त्यांचे हे गिर्यारोहणाचे प्रेम पाहून गडावर उपस्थित असणाऱ्या इतर गिर्यारोहक व पर्यटकांनी त्यांचे कौतुक केले.
हरीहर गडावरच्या या संपूर्ण गिर्यारोहणात सचिन गिरी यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी कविता आणि मुलगी सुरभी यांची त्यांना साथ मिळाली.
