‘रक्तदान हेच खरे जीवनदान’ गिरीश मालपाणी
प्रतिनिधी —

रक्तदान हे पवित्र कार्य आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण रक्तदान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तुमचा रक्ताचा एक थेंब हा इतरांना जीवनदान देऊ शकतो म्हणून रक्तदान हेच खरे जीवनदान आहे. असे प्रतिपादन लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी केले.

संगमनेर वरीष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, विधी महाविद्यालय, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ओंकारानाथ मालपाणी यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते
याप्रसंगी सुभाष मणियार, महेश डंग, अर्पण ब्लड बँकेचे प्रमुख डॉ.अतुल जैन, मीना मणियार, डॉ.मधुरा पाठक, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र लढ्ढा, देविदास गोरे, पुजा कासट, स्वाती मालपाणी आदी उपस्थित होते.

पुढे बोलतान मालपाणी म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असे दान आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा नेहमी धावपळ करत असतो, या त्याच्या नित्याच्या धावपळीमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. हे त्यास लवकर जाणवत नाही. शरीराची काळजी न घेतल्याने त्यास नकळत अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळी आपल्याच काही नातेवाईकांना अथवा इतर आपल्या मित्रजणांना रक्ताची नितांत गरज भासते. तेव्हाच आपणांस रक्ताच्या एका थेंबाची किंमत कळते. ही गरज लक्षात घेऊन आपण रक्तदान केल्यास आपण निश्चितच अनेक व्यक्तींचे प्राण वाचवु शकाल व त्यापासुन आपणांस आत्मिक समाधानही मिळेल. हे मिळालेले समाधान आपल्या आरोग्यास निश्चित लाभदायी ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड म्हणाले की, कोविड-१९ सारखी भयावह परिस्थिती, अपघात, विविध आजार यासाठी सातत्याने रक्ताची गरज भासत असते. सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. अशा परीस्थितीत रक्तदान करणे ही सामाजिक बांधिलकी जोपासणारे एक सर्वश्रेष्ठ कार्य आहे. आपण केलेल्या या रक्तदानामुळे आपण एखाद्याचे अनमोल प्राण वाचवु शकता. म्हणून रक्तदानासारखे दुसरे श्रेष्ठ कार्य नाही असेही ते म्हणाले.

या रक्तदान शिबीरात महाविद्यालयातील एन.एस.एस., एन.सी.सी. विद्यार्थी, ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन एकुण ९५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन कदम यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले व आभार प्रा. हेमलता तारे यांनी मानले.

या शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ.मारुती कुसमुडे, प्रा.सचिन पठारे, प्रा.खेमनर, राष्ट्रीय छात्र सेनेचे सीटीओ डॉ.नरेंद्र फटांगरे, प्रा.हेमलता तारे, अर्पण ब्लड बँकेच्या जनसंपर्क अधिकारी प्रमिला कडलग, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
