संगमनेर तहसील कार्यालयाची रंगरंगोटी ! कर्तव्याची आणि जबाबदारीची रंगरंगोटी कधी होणार ?

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा॥

प्रतिनिधी —

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा॥

संत चोखामेळा यांनी आपल्याला ही शिकवण देऊन ठेवली आहे. मात्र आपल्याला त्याचा नेहमीच विसर पडतो. किंवा आपण ते सोयीस्कररित्या विसरतो. ऊस वरुन कितीही वाकडातिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोड असतो. त्यामुळे वरवरच्या गोष्टींकडे लक्ष न देता आतल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

तसेच वरवरची कितीही रंगरंगोटी केली, कितीही जाहिरातबाजी केली, तरी आतला काळेपणा लपत नाही आणि तो लपणारही नाही. त्यामुळे वरवरच्या रंगरंगोटीला भुलून न जाता. आत मध्ये काय काय काळं बेरं दडलेल आहे याबाबत समाजाने जागृत असायला हवे.

संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागतही केले आहे. आणि अभिनंदनही केले आले आहे. संगमनेरचे नागरिक चांगल्या गोष्टींचे अभिनंदन करतातच. मात्र त्याची दुसरी वाईट बाजू मांडताना त्यावर ठोस टीकाही करतात. त्यामुळे या तहसील कार्यालयाच्या रंगरंगोटीची चर्चा जरी होत असली तरी त्यांच्या दुसऱ्या बाजूचीही ‘चर्चा तर होणारच !’

महसूल मंत्री आपल्या तहसील कार्यालयाच्या आवारात कार्यक्रमाला येणार म्हणून संगमनेरच्या तहसीलदारांनी तहसील  कार्यालयाची इमारत बाहेरून रंगरंगोटी करुन सजवली. या इमारतीच्या जिन्यांच्या बाजूच्या भिंतींवर वेगवेगळी रंगीत चित्रे काढण्यात आलेली आहेत.

भिंतींवर समाजप्रबोधनपर व काही माहिती फलक लावले आहेत. महसूलमंत्र्यांना चालण्यासाठी लाल रंगाच्या पायघड्या पण टाकण्यात आल्या होत्या. साधारण एक-दीड तास महसूलमंत्री हे कार्यालयात आले होते. मात्र कार्यालयाच्या रंगरंगोटीची चर्चा त्याहीपेक्षा जोरदार चालू आहे.

या रंगरोटीला खर्च किती आला ? खर्च कुठून केला ?  कशासाठी ही रंगरंगोटी करण्यात आली ? अशी रंगरंगोटी करणे हा शासकीय कार्यक्रम होता काय ? या रंगरंगोटी साठी नियमाप्रमाणे टेंडर काढले होते काय ? शासकीय खजिन्यातून  याची बिले अदा करण्यात आली आहेत काय ? असे अनेक प्रश्न शहरातून चर्चीले जात आहेत.

ही बाब जरी वेगळी असली, तरीही कार्यालयाची वरवरची रंगोटी चांगलीच चर्चेत आली. प्रसार माध्यमातून आणि सोशल मीडियातून तहसील कार्यालयाच्या या रंगरंगोटीची चर्चा झाली. बातम्याही आल्या. तहसीलदार साहेबांचे कौतुकही झाले. त्यांना आयडिया देणाऱ्या प्रांत साहेबांचे देखील कौतुक झाले. चांगले दोन चार दिवस अशी ‘रंगबाजी’ या तहसील कार्यालयाच्या रंगरंगोटीने झाली. त्यानंतर मात्र तहसील कार्यालयाच्या बाहेरच्या रंगरंगोटीला न भुललेल्या समंजस नागरिकांनी आतल्या रंगावर चर्चा करण्यास सुरुवात केली. तहसील कार्यालयाचा आतला रंग मात्र वेगळाच असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. बाहेर जरी कितीही रंगरंगोटी आणि सप्तरंगाने  तहसील कार्यालय सजले असले तरी आत मधून मात्र ते तहसील कार्यालय, तहसीलदारांच्या सह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीने ते काळवंडले असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिक देतात.

नागरिकांना आलेले अनुभव हे अतिशय वाईट आहेत. जसे कार्यालय रंग-बिरंगी आहे तसे त्यातल्या माणसाचे मन नाही. आतली माणसे काळ्या व संकुचीत मनाची आहेत. भ्रष्टाचारी आहेत. पिळवणूक करणारे आहेत. छळवणूक करणारे आहेत. अशा विविध प्रक्रिया ऐकण्यास मिळतात. अनेक कामांना विलंब केला जातो. तक्रारींचे निवारण लवकर होत नाही. बेकायदेशीर कामांकडे दुर्लक्ष केले जाते. विशेषत: नागरिकांनी केलेल्या खास तक्रारी बाजूला टाकल्या जातात. माहिती अधिकारातही चालढकल केली जाते. तहसील कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या संपूर्ण तालुक्यातील अवैध गोष्टींकडे कानाडोळा केला जातो.

यामध्ये गौण खनिजाची चोरी, वाळू तस्करी, बेकायदेशीर हॉटेल, ढाबे, लॉजिंग व्यवसाय, बेकायदेशीर बांधकामे, रेरा कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर रस्ते तयार करणे असे अनेक प्रकार आहेत. तहसील खाते अशा बाबींकडे दुर्लक्ष करते.अशा अनेक तक्रारी नागरिक सांगतात.

संगमनेरच्या कार्यालयाची जरी रंगरंगोटी केली असली तरी आतल्या आत्म्याची रंगरंगोटी कधी करणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे. आपण नागरिकांच्या सेवेसाठी आहोत हे सोयीस्कररीत्या विसरले जाते.

याच तहसील कार्यालयात पडलेला कचरा, घाण यामुळे ‘तहसील कार्यालची कचराकुंडी’ झाली असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व काही नगरसेवकांनी ‘गांधीगिरी’ करत तहसील कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवली होती. 

तहसील कार्यालयाच्या निर्जीव भिंतीवर अनेक गोष्टी मथळे लिहिलेले आहेत. यामध्ये माणसाच्या मनातील आणि वागण्यातील हाव, लालच, परस्परातील फुट, मनभेद, मुखत्यारपत्र, हक्क नोंदणी, एका जमिनीचे दोनदा व्यवहार, देवाची जमीन, जमिनीचे वाटप, वारस नोंद अशा वेगवेगळ्या विषयांच्या छोटेखानी बोधकथांचा वापर केलेला आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारात यासर्व फ्रेम करून लावण्यात आल्या आहेत.

हे फक्त वरवरचे रुपडे आहे. या सर्व गोष्टींना खतपाणी घालून पैशाच्या मोहात, लालची पणा करून रेकॉर्डवरच्या नोंदी, फेरफार कोण बदलते ?  पैसे घेऊन सातबारा उताऱ्यांवर बोगस नावे कोण लावतात ? कागदपत्रे कोण बदलतात ? देवांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकामे कोणाच्या सहकार्यामुळे होतात ? शहरातील आणि तालुक्यातील नैसर्गिक ओढे, नाले, नद्या यांचे स्रोत बदलून त्यावर अतिक्रमण करून कोण इमारती बांधत आहेत ? त्याला कोणाचे आशीर्वाद असतात ? तक्रारी करूनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष का केले जाते ? दलित, आदिवासींच्या जमिनी, इनामी जमिनी यावर अतिक्रमण होणे, त्या हडप करणे, उताऱ्यावर अचानक दुसऱ्यांची नावे लागणे हे कोणाच्या आशीर्वादाने चालू असते ? याचेदेखील आत्मचिंतन तहसील कार्यालयासह संपूर्ण महसूल विभागाने करायला हवे.

तहसील कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या स्वच्छतेबाबत आणि कचऱ्याबाबत वेळोवेळी वृत्तपत्रातून बातम्या छापून आल्या आहेत. तहसीलदारांची रंगरंगोटी नागरिकांच्या पचनी पडते किंवा नाही, हे महत्त्वाचे असो अथवा नसो. मात्र स्वतःच्या ‘आतल्या आवाजाची रगरंगोटी करणे’ संगमनेरच्या संपूर्ण महसूल विभागाला गरजेचे आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!