धोकादायक 33 केव्ही विद्युत वाहिनी हटविण्यासाठी उपोषण सुरू….!
माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यातील काही गावांमधून 33 केव्ही विद्युत वाहिनी धोकादायक पद्धतीने नेण्यात आली आहे. विशेष म्हणजे निळवंडे धरणातून संगमनेरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वर देखील या विद्युत वाहिनेचे पोल उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशी ही धोकादायक विद्युत वाहिनी पाठविण्यात यावी या मागणीसाठी बाधित गावातील शेतकरी नागरिक कृती समितीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करावा असे आवाहन केले आहे.

या उपोषणकर्त्यांनी खालील प्रकारे प्रमाणे मागण्या केल्या आहेत
1) संगमनेर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या निळवंडे पाईपलाईनवरील धोकादायक व बेकायदेशीर पोल तात्काळ हटविण्यात यावेत.
2) महावितरण द्वारे राजापूर, मंगळापूर, चिखली व धांदरफळ हद्दीतून स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या घर, गोठे, व्यापारी गाळे, शाळा, स्मशानभूमी, मंदिरे व इतर आस्थापणांच्या वरून व अतिशय नजिक च्या अंतरावर टाकलेली 33KV ची सदर विद्युत वाहिनी त्या त्या भागातील ग्रामपंचायतींनी बेकायदेशीर ठरवलेली लाईन त्वरित हटवावी.
3) कोल्हार घोटी राज्य मार्गाच्या लगत चिखली व धांदरफळ हद्दीत यापूर्वीच्या 11KV, स्ट्रीट लाईट, इंडस्ट्री 3 फेज (गावठाण) व शेती पंप लाईन मध्ये नव्याने 33KV चे पोल उभारून ही बेकायदेशीर लाईन टाकलेली आहे. तरी ह्या बेकायदेशीर लाईन मुळे इतर अस्तित्वात असलेल्या लाईन्सच्या कार्यक्षमतेचा व प्रभावित होणाऱ्या मेंटेनन्सचा मुद्दा वादातीत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतने बेकायदेशीर ठरवलेल्या 33KV चे पोल हटविण्यात यावेत.
4) नामोल्लेख केलेल्या गावांच्या हद्दीत कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या अगदी लगत व लाईनच्या कक्षेत येणाऱ्या बहुतांशी ट्रान्सफॉर्मरच्या जवळून 33KV लाईन टाकलेली असून भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित सदर 33KV लाईन हटविण्यात यावी.


