संगमनेरमधील गोवंश हत्या आणि तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची बजरंग दलाची मागणी !

संगमनेर : प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असलेल्या गोवंश हत्या आणि तस्करी मधील सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारीची कठोर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे l निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा हा ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेला भाग असून, संगमनेर शहर व तालुक्यात गेल्या काही काळापासून गोहत्येचे आणि अवैध मांस विक्रीचे जाळे सक्रिय झाले आहे. स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून (एलसीबी) अनेकदा कारवाई करून गोवंशाची सुटका करण्यात आली असली तरी, संबंधित सराईत आरोपी जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करत महाराष्ट्र विघातक कृत्ये प्रतिबंधक कायदा (MPDA) तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व संशयित गो-तस्कर व कसाई यांची यादी तयार करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून गोवंश हत्या पूर्णपणे थांबेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन ऋषिकेश भागवत (गोरक्षा प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून, विहिंप-बजरंग दल संगमनेर प्रखंडाचे कुलदीप ठाकूर, सुरेश कालडा, ओमकार भालेराव, कृष्णा डंबीर, अनिकेत पवार, सागर पाटील, आकाश बनकर, चिराग साहू, साई ठाकूर, संतोष भोसले, गौरव वराडे, श्रीकांत मोरे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्री, पालकमंत्री, पोलिस अधीक्षक आदींनाही पाठविण्यात आल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!