अहिल्यानगर मध्ये लॉंग मार्च !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांच्या वतीने शेतकरी व कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील राजुर येथून 24 फेब्रुवारी रोजी भव्य लाँग मार्च काढण्यात येणार आहे. अकोले, संगमनेर, लोणी मार्गे हा लाँग मार्च 148 किलोमीटरचे अंतर पायी पार करीत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. 

नाशिक व ठाणे पालघर लॉंग मार्च मधील तसेच 2023 मध्ये अकोले ते लोणी लॉंग मार्च मधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी करावी तसेच नाशिक पुणे हाई स्पीड रेल्वे बाबत देण्यात आलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. 

सरकारने मान्य केल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील वन जमिनी, गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दाव्यांची पुन्हा पडताळणी करण्यात यावी, घराच्या तळ जमिनी नावे व्हाव्यात, बांधकाम कामगारांना सर्व आजारांसाठी मेडिकल योजना लागू करावी, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे देवठाण, बोटा स्टेशनसह पूर्वीच्या सर्वे प्रमाणे व्हावी, शालेय पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ परिचर, अंगणवाडी, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, यांच्या मानधनात व मोबदल्यात रास्त वाढ करून त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा. भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनासाठी व पिण्यासाठी शासकीय योजनेतून पाणी उपलब्ध करून द्यावे. निराधारांना किमान पाच हजार रुपये मानधन द्यावे, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक दर्जाच्या कराव्यात इत्यादी मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. 

लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर काल अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाँग मार्चच्या मागण्यांबाबत अकोले तहसील कार्यालयामध्ये तीन तास बैठक पार पडली. जिल्हा प्रशासनाने मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत गांभीर्याने सकारात्मकता दाखवली असली तरी राज्यस्तरीय मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी संबंधित सर्व मंत्र्यांच्या समवेत बैठक होण्याची आवश्यकता आहे. बैठकीबाबत सकारात्मकता दाखवण्यात आली असली तरी एकीकडे आंदोलन व सोबतच चर्चा अशा पद्धतीने संघटना पुढे जाईल असे किसान सभा व सीटू कामगार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

राजुर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाला निवेदन देऊन या लॉंग मार्चची सुरुवात करण्यात येणार असून हजारोच्या संख्येने शेतकरी, कर्मचारी व कामगार या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे आदींनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!