टोल कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी, थकीत वेतन देणार ; आश्वासनांतर उपोषण मागे…..

आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश

संगमनेर / प्रतिनिधी —

तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्यानंतर सुरू झालेल्या साखळी उपोषणाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कमी करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच थकीत वेतन अदा करण्याचेही आश्वासन देण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले टोल कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते नारळपाणी देऊन मागे घेण्यात आले.

पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नव्याने आलेल्या जे.आर. रोडवेज कंपनीचे मालक राजपाल यांनी अचानक कामावरून कमी केले होते. काही कर्मचाऱ्यांच्या पगारात कपातही करण्यात आली होती. या निर्णयाच्या निषेधार्थ संतप्त कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले होते.

यानंतर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर पी. डी. कदम, टोल प्लाझा कंपनीचे मॅनेजर अनुप शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, शिवसेनेचे श्याम राहाणे तसेच टोल प्लाझा वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष विलास राहाणे उपस्थित होते.

आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेत कामावरून कमी करण्यात आलेल्या सर्व २२ कर्मचाऱ्यांना तत्काळ पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, सर्व टोल कर्मचाऱ्यांच्या पगारातील कपात रद्द करून पगार पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत लक्षात घेऊन प्रीती बिल्डर कंपनीचे मालक पुढील आठवड्यात आल्यानंतर वेतनवाढ व पीएफ संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

तसेच १४ कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन विधी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाशी चर्चा करून पुढील आठवड्यात देण्याबाबत सूचना करण्यात येतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, या आंदोलनात टोल प्लाजा कामगार युनियन कार्याध्यक्ष विलास राहाणे, मयूर दिवटे. तुषार खताळ. प्रवीण शिरतार, रावसाहेब पावसे, सखाराम पावसे, ओम शिरोळे, ओमकार मंडलिक, सचिन शिंदे, योगेश काळे, अजित रहाणे, विक्रम रहाणे, गोकुळ पावसे, संकेत गडकरी, किशोर जगताप, पंकज नेहे व सर्व टोल नाका कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!