अकोले तहसील कार्यालयावर भारत बंद निमित्त अंगणवाडी कर्मचारी सभेचा मोर्चा व निदर्शने
अकोले प्रतिनिधी —
केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारने कामगारांनी अनेक वर्ष संघर्ष करून मिळवलेले अधिकार नष्ट करण्यासाठी कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता तयार केल्या. त्या विरुद्ध काल दिनांक १२ फेब्रुवारी रोजी देशभर एक दिवसाचा संप पुकारण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने ॲड. निशाताई शिवूरकर आणि सत्यभामा थिटमे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चाने जाऊन जोरदार निदर्शने केली.

मोदी सरकारचा धिक्कार असो, चार कामगार संहिता रद्द करण्यात याव्या, सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध असो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, दरमहा पेन्शन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतनश्रेणी मिळावी इत्यादी मागण्या या मोर्चामध्ये करण्यात आल्या.
ॲड.. निशा शिवूरकर यांनी भाषणात, “केंद्र सरकारचे कामगार, कष्टकरी आणि शेतकरी विरोधी धोरण सामान्य जनतेचे मरण ठरले आहे. मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला व्यापारी करार भारतातील शेती व शेतकरी यांना संकटात टाकणारा आहे. सरकारच्या या सर्व धोरणाविरुद्ध तीव्र संघर्ष करण्यात येईल”, असा इशारा दिला.
निदर्शकांच्या वतीने नायब तहसीलदार यांना तसेच महिला बाल विकास अधिकारी अर्चना एखंडे यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चा समोर सत्यभामा थिटमे, उषा शेलार, कल्याणी देशमुख, सोनू तळपाडे, बेबी हरनामे, निशा साबळे, मंगल लांडे, रत्ना सोनवणे इत्यादींची भाषणे झाली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनंदा कदम, सीमा गायकर, अनुसया वराडे, अनिता सदगीर, शकुंतला चासकर इत्यादींनी प्रयत्न केले.
