निसर्गाच्या रंगछटांचे दर्शन घडवणारा देखणा छायाचित्र सोहळा !

अकोल्यात ‘निसर्ग माझा‘ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  —

वेगवेगळ्या ऋतूतील निसर्गाच्या वेगवेगळ्या रंगछटांचे विभ्रम, कोळ्याच्या जाळ्यावर चमकणारे नक्षीदार दवबिंदू, विविध रंग आकारांची रानफुले, रमणीय भूप्रदेश, सूर्योदय–सूर्यास्ताचे सोहळे, कीटकसृष्टीपासून बैलगाडी व सरड्यापर्यंतचे जिवंत दृश्य टिपणारी देखणी छायाचित्रे पाहून अकोलेकरांची मने हरखून गेली. विशेषतः रविवारच्या शाळेत येणाऱ्या मुलांनी हे प्रदर्शन पाहून मोठा आनंद व्यक्त केला.

राहाता तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले हौशी निसर्ग छायाचित्रकार जयेश गायकवाड यांनी मोबाईलमध्ये टिपलेल्या ‘निसर्ग माझा’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन अकोले येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भरवण्यात आले होते. यशोदा हॉस्पिटल व अकोले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन केले होते. निसर्गाचे विविध मूड्स कॅमेऱ्यात अलगद पकडणारी विलोभनीय छायाचित्रे पाहण्याची संधी अकोलेकरांना यानिमित्ताने मिळाली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त हौशी छायाचित्रकार, गिर्यारोहक व प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. नितीन बस्ते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर, यशोदा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन नवले, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मनोज सदाफुले, अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भूलतज्ज्ञ डॉ. सखाराम घनकुटे, शिक्षक नेते बापू तांबे, राजेंद्र सदगीर, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब आभाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश साळवे, मीडिया इन्फोटेकचे संचालक सुधीर फरगडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बस्ते यांनी जयेश गायकवाड यांच्या छायाचित्रांचे मनापासून कौतुक केले. छायाचित्रण हा मानसिक ताण कमी करणारा उत्कृष्ट छंद असून, निसर्ग छायाचित्रण मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले. जीवनात प्रयत्नशील राहण्याचे महत्त्व अधोरेखित करत, जिद्द, चिकाटी व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

हौशी निसर्ग छायाचित्रकार व शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी गायकवाड यांच्या छायाचित्रांचे रसग्रहण केले. निसर्ग छायाचित्रण म्हणजे सौंदर्य, शांतता व चैतन्य टिपण्याची कला असून, ती गायकवाड यांनी आत्मसात केली आहे, असे त्यांनी सांगितले. छायाचित्रण ही केवळ कला नसून निसर्गाशी जोडणारी भावनिक भाषा आहे. छायाचित्रकार डोळ्यांनी निसर्ग पाहतो, मनाने अनुभवतो आणि छायाचित्रात उतरवतो. ऋतूंचे बदल, प्रकाश-सावल्यांची जादू, पाणी, पक्षी व कीटक यांमुळे छायाचित्रे अधिक जिवंत होतात. गवताच्या पात्यावरचा दवबिंदू साधा वाटला तरी तो कलात्मक पद्धतीने टिपल्यास त्यातील सौंदर्य अधिक खुलून दिसते. 

छायाचित्रण एक कला आहे. छायाचित्रे ही छायाचित्रकाराच्या भावनांची अभिव्यक्ती असते. काही छायाचित्रे मनाला शांत करतात, काही आश्चर्यचकित करतात, तर काही विचार करायला भाग पाडतात. उत्तम छायाचित्रे निसर्ग संवर्धनाचा संदेश देतात आणि निसर्ग जपण्याची प्रेरणा निर्माण करतात. तंत्रापेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असून तो जयेश गायकवाड यांच्याकडे असल्याचे चासकर म्हणाले. शिक्षक नेते बापू तांबे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी डॉ. जयसिंग कानवडे, डॉ. उमा कुलकर्णी, रविवारच्या शाळेचे आयोजक पत्रकार श्रीनिवास रेणुकादास, मीनल चासकर, संतोष दळे, पंकज दर्शने, कैलास सहाणे, संदीप पोखरकर, श्याम शेजवळ पंकज दर्शने, प्रवीण दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गवांदे यांनी केले. अण्णासाहेब आभाळे यांनी आभार मानले. रविवारच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘निसर्ग माझा’ या छायाचित्र प्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेतला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!