सर्वोच्च कळसुबाई शिखरावर नववर्षाचे भक्तिमय स्वागत !
30 वर्षांची परंपरा
अकोले प्रतिनिधी —
व्यसनमुक्तीचा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्याची प्रेरणादायी परंपरा घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळ गेल्या तीन दशकांपासून अखंडपणे जपत आहे. मराठी नूतन वर्ष असो वा इंग्रजी नववर्ष, प्रत्येक नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर करण्याची ही आगळीवेगळी परंपरा मंडळाने गेली ३० वर्षे सातत्याने जोपासली आहे.

इंग्रजी नववर्ष २०२६ च्या प्रथमदिनी कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच कळसुबाई शिखरावर चढाई करत सूर्योदयाच्या सोनेरी किरणांत शिखरस्वामिनी कळसुबाई मातेचा पंचामृत अभिषेक, पूजन व आरती केली. भक्तिभावाने सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

मंडळाच्या वतीने केवळ ट्रेकिंगपुरतेच नव्हे, तर सामाजिक भान जपत व्यसनमुक्ती, आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यावर भर दिला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कळसुबाई मातेची नियमित सेवा तसेच वर्षभर कळसुबाई शिखर व जिल्ह्यातील विविध गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिकमुक्त परिसर ठेवण्याचा संकल्प मंडळाकडून सातत्याने राबवला जात आहे. हा संकल्प पुढील काळातही कायम ठेवण्याचा निर्धार गिर्यारोहकांनी व्यक्त केला.

या नववर्ष स्वागत सोहळ्यात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्यासह प्रवीण भटाटे, नीलेश पवार, सुरेश चव्हाण, अशोक हेमके, बाळासाहेब आरोटे, भगीरथ म्हसणे, भगवान तोकडे, सोमनाथ भगत, सुधाकर तांबे, नामदेव जोशी, संजय शेवाळे, गोकुळ सूर्यवंशी, नाना टाकळकर, ज्ञानेश्वर काळे, सागर पलटणे, नितीन भागवत, संदीप खाडे, तानाजी खाडे, गजानन चव्हाण, राजू मराडे, हरीष आतकरी, गुरुनाथ आडोळे, देवीदास पाखरे यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले अनेक ट्रेकर्स सहभागी झाले होते.
व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवणारी ही ३० वर्षांची परंपरा पुणे नगरीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
