भंडारदरा- कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात….
थर्टी फर्स्ट वाले सावधान ! अन्यथा कायदेशीर कारवाई !!
रात्रीच्या वेळी जंगलात फिरण्यास मनाई ; नशिले पदार्थ अमली पदार्थांवर बंदी
हरिश्चंद्रगड – पाचनई पायथा विशेष काळजी घेण्याची गरज…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
भंडारदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करताना पर्यटकांना अनेक प्रकारचे काळजी घ्यावी लागणार आहे वन्यजीव विभाग वन्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने 31 डिसेंबर साजरा करताना निर्बंध घातले असून नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत.

संपूर्ण राज्याचे आकर्षण असणाऱ्या भंडारदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर 31 डिसेंबर चा उत्सव साजरा केला जातो मोठ मोठ्या शहरातून पर्यटक आणि नागरिक या ठिकाणी 31 डिसेंबर साजरा करतात मोठ्या प्रमाणावर गर्दी या परिसरात उसळलेली असते अनेक कुटुंबे लहान मुले त्याचबरोबर तरुण तरुणी सर्वजण यात सहभागी असतात त्या परिसरातले व्यवसायिक वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतात यातून वन्यजीवांना अभयारण्याला पर्यावरणाला कुठलेही हानी पोहोचू नये म्हणून वन्यजीव विभाग वन्य विभाग आणि पोलिसांनी नियमबाह्य कृती करण्यास कडक निर्बंध घातले आहेत

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा वनविश्रामगृह, शेंडी येथे पोलिस, वन्यजीव विभाग, हॉटेल मालक व टेंट कॅम्पिंग चालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावीत, सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी उपस्थितांना विविध सूचना केल्या आहेत आणि या सूचनांचे योग्यरित्या पालन करण्याचे बजावले आहे.

अभयारण्य क्षेत्रातील वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध निर्बंध लागू करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
टेंट कॅम्पिंग, रिसॉर्ट, लॉज, हॉटेल व होमस्टेमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांची आधारकार्डासह नोंद रजिस्टरमध्ये घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अभयारण्यात वन्यजीवांना त्रास होईल अशा मोठमोठ्या प्रकाश झोतांना आणि जंगलातील वृक्षांवर प्रकाशाचा परिणाम होणार नाही अशा लाईट डेकोरेशनला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

तसेच डीजे व मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम यंत्रणा मोठ्या आवाजातील फटाके यांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पर्यटकांना रात्री जंगल क्षेत्रात फिरण्यास बंदी असून अभयारण्यात मद्यपान, धूम्रपान तसेच कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या सेवनास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ, घातक शस्त्र सोबत बाळगण्यासही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

हॉटेल व टेंट कॅम्पिंग चालकांनी आणि पर्यटकांची विविध पर्यायाने राहण्याची व्यवस्था करणाऱ्या होम स्टे मालकांनी येणाऱ्या पर्यटकांकडून शांततेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मोठ्याने आरडाओरडा करणे गाड्यांचे हॉर्न वाजवणे, किंचाळणे, भांडणे किंवा कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित मालकांवर राहील. वरील नियमांचा भंग झाल्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

हरिश्चंद्रगड – पाचनई पायथा विशेष काळजी घेण्याची गरज…
संपूर्ण महाराष्ट्रातून हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी पर्यटक, गिर्यारोहक आणि हौशी निसर्गप्रेमी येत असतात. प्रत्येक शनिवार रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी जमते. लहान मोठ्या वाहनांबरोबर मोठमोठ्या लक्झरी बसेस सुद्धा या ठिकाणी येत असतात. 31 डिसेंबर साठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होणार आहे. हरिश्चंद्रगडावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हॉटेलिंगचा व्यवसाय सुरू झाला आहे. या ठिकाणी वन्यजीव संरक्षण पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. तसेच पुरातत्व विभाग देखील या ठिकाणी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. परिसरात अनेक हॉटेल होम स्टे घरगुती राहण्याच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सर्व बाबींवर संबंधित विभागाने बारकाईने लक्ष ठेवावे जेणेकरून या पवित्र परिसरात नशाखोरी, अमली पदार्थ तसेच पर्यावरण वन्यजीवांची हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. संबंधित व्यवसायिकांकडून अनेक वेळा या बाबींचे उल्लंघन होताना दिसते. याबाबत तेथील व्यवसायिकांना कडक सूचना द्याव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींची आहे.
