हायस्पीड रेल्वे संगमनेरहून नेण्यासाठी जन आंदोलन उभे करावे लागेल — आमदार सत्यजित तांबे 

 लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

केंद्र सरकार वेगवेगळी कारणे पुढे करून आपल्या हक्काची रेल्वे शिर्डी मार्गे नेत आहे आता आपल्याला आपले हक्क मिळवण्यासाठी जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला आहे.

नाशिकहून पुण्याकडे जाणारी हायस्पीड रेल्वे अचानकपणे शिर्डी मार्गे वळवण्यात आली. मुळात ही रेल्वे नाशिक संगमनेर नारायणगाव पुणे अशा मार्गावरून जाणार होती. मात्र केंद्र सरकारकडून विविध कारणे सांगून या मार्गे जाणारी रेल्वे शिर्डी मार्गे वळविण्यात आली असल्याचे समोर आले आहे. संगमनेर लोणी चा राजकारणात ‘रेल्वे हा कळीचा मुद्दा’ ठरला आहे.

यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी एक ट्विट केले असून त्या मध्ये म्हटले आहे की, GMRT (Giant Metrewave Radio Telescope) चे कारण पुढे करून संगमनेरच्या हक्काची रेल्वे शिर्डीमार्गे नेली जात आहे. केंद्र सरकार नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे ही खरोखर दुर्दैवी बाब आहे.

ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली ते लोकप्रतिनिधी या विषयावर मूग गिळून गप्प बसले आहेत याचं वाईट वाटतं. जर लोकप्रतिनिधी याबाबत गप्प बसत असतील तर जनतेलाच आपल्या हक्कांसाठी लढावं लागेल, जन आंदोलन उभं करावा लागेल, ही वेळ आता आली आहे.

खोडद येथील GMRT (Giant Metrewave Radio Telescope) ही एक मोठी रेडिओ दुर्बीण आहे, जी पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात स्थित आहे. ही दुर्बीण खगोलशास्त्रीय संशोधनासाठी वापरली जाते आणि खगोलशास्त्रज्ञांना गुरुत्वाकर्षण लहरी आणि आकाशगंगा समूहांसारख्या गोष्टींचा अभ्यास करण्यास मदत करते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!