लोकशाहीला विघातक असणाऱ्या शक्तींच्या विरोधात क्रांतीचा नारा देण्याची गरज — माजी मंत्री बाळासाहेब थोरात 

स्वातंत्र्य धोक्यात आले आहे — डॉ. तांबे 

संगमनेर मध्ये ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा 

संगमनेर प्रतिनिधी —

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिन, चले जाओ चे मोठे आंदोलन झाले. देश स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटना आली. मात्र ज्या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान दिले नाही. इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही. ते लोक आज जातीभेदाच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज आहे देश , लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची याकरता या लोकशाही विरुद्धच्या विघातक शक्तींविरोधात क्रांतीचा नारा देण्याची मोठी गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

क्रांती दिनानिमित्त शहरातील नेहरू चौक येथील अशोक स्तंभास अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, हिरालाल पगडाल, प्रा. बाबा खरात, गजेंद्र नाकील, नितीन अभंग, अजित काकडे, अंबादास आडेप, जीवन पांचारिया, दिलीप जोशी, अभय खोजे, भारत शेलकर, निखिल पापडेजा, प्रमोद कडलग, सुभाष दिघे, बाळासाहेब काळे, जालिंदर ढोकरट उपस्थित होते. यावेळी संगमनेर शहरांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.

थोरात म्हणाले की, क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो हे आंदोलन या दिवशी सुरू झाले. संपूर्ण देश पेटून उठला. नंदुरबारचा अकरा वर्षाचा शिरीष कुमार झेंडा घेऊन निघाला त्याला ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या. अनेक क्रांतिवीर, देशभक्त यांच्या त्यागातून आणि बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यघटना मिळाली. गरिबाला मताचा अधिकार आला.

मात्र सध्या देशांमध्ये जातीयवादी शक्ती दिशाभूल करत आहेत. ज्या शक्तींनी कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही. इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही. यांच्यापैकी कोणीही तुरुंगात गेले नाही. आज मात्र दुर्दैवाने ती लोक जातीभेदाच्या नावावर राजकारण करत आहेत. देशाची दिशाभूल करत आहेत. यापुढील काळामध्ये देश, लोकशाही आणि राज्यघटना वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे असून लोकशाही विरुद्ध असलेल्या या विघातक शक्ती विरुद्ध क्रांतीचा नारा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्य धोक्यात आले आहे — डॉ. तांबे 

डॉ. तांबे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये आठ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाची दिशा ठरली त्याच रात्री सर्व राष्ट्रपुरुषांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले. जनता मात्र पेटून उठली. चले जाव ही मोठी लोक चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि त्यामधून हे स्वातंत्र्य मिळाले. मात्र हे स्वातंत्र्य आणि लोकशाही सध्या धोक्यामध्ये आली असून ही लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आता सर्वांनी एकजुटीने लढावे असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी सर्वांनी अशोक स्तंभाला अभिवादन केले. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस स्थानक परिसरामध्ये प्रभात फेरी संपन्न झाली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!