राज्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार

महसूल सेवेचे सक्षमीकरण, जनजागृती व लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दिनांक 31 –

शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘महसूल सप्ताह – २०२५’ चे दि.१ ऑगस्ट ते दि.७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या योजनांची माहिती, लाभ व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.

सप्ताहाची सुरुवात दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिना’ पासून होणार असून, याप्रसंगी विभागीय व जिल्हास्तरावर महसूल खात्यातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जाईल. तसेच, उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना योजनांतील प्रमाणपत्रांचे वाटप, ई-हक्क पोर्टलचा वापर, ऑनलाईन सेवा राबविणे, सेतु केंद्रांमार्फत नागरिकांचे अर्ज स्वीकारणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी विशिष्ट उद्देश ठेवून उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


दि.२ ऑगस्ट रोजी, २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना अधिकृत पट्टे वाटप करण्यात येतील. ग्रामसेवक व तलाठ्यांनी अशा लाभार्थ्यांची यादी तयार करून पुनर्विलोकन करावे व विभागीय मंजुरीनंतर लाभार्थ्यांना पट्टे दिले जातील.
दि.३ ऑगस्टला, शेत पाणंद व वशिरस्त्यांवरील अतिक्रमणांची मोजणी करून त्यांना मुक्त करून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल. वृक्षलागवड मनरेगा, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था व शेजारी शेतकऱ्यांच्या सहभागाने केली जाईल.

दि.४ ऑगस्ट रोजी, महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबवले जाईल. यात विभागीय शिबिरे, विविध योजनांचे प्रमाणपत्र वितरण, जात-उत्पन्न-रहिवासी दाखले देणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत, तसेच घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचा ताबा व मिळकत नोंद एकत्रित नावाने देण्याची कार्यवाही केली जाईल.

दि.५ ऑगस्टला, थेट लाभ हस्तांतर DBT (Direct Benefit Transfer) योजनेतील लाभ मिळाले नसलेल्या लाभार्थ्यांची घरोघरी भेट देऊन आधार, बँक लिंक, केवायसी तपासून थेट लाभ प्राप्त होईल यासाठी कार्यवाही केली जाईल.

दि.६ ऑगस्ट रोजी, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे, शर्तभंग प्रकरणांची फेरतपासणी, कूळ कायद्यानुसार लाभ मिळालेले शेतकरी, इनाम जमिनी पुनवसन आणि शेतकऱ्यांच्या नावावर ७/१२ वरुन शर्ती कमी करण्याचे काम केले जाईल. ७ ऑगस्ट रोजी, शासनाच्या नवीन कृत्रिम वाळू (M-Sand) धोरणाची अंमलबजावणी, विभागीय पातळीवर कार्यशाळा, विशेष चर्चासत्रे आयोजित करून महसूल सप्ताहाचा समारोप समारंभ साजरा केला जाईल.

या संपूर्ण आठवड्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व महसूल कर्मचारी नागरिकांपर्यंत महसूल सेवा पोहोचवण्यासाठी सज्ज राहतील. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पडेस्क व व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात येणार असून, नागरिकांच्या शंका व अडचणींचे निरसन तत्परतेने करण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे व्हिडिओ, प्रसिद्धिपत्रके तयार करून वृत्तपत्रे, सोशल मिडिया व स्थानिक माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.

‘महसूल सप्ताह – २०२५’ हा उपक्रम महसूल खात्याच्या पारदर्शक, सक्षम व लोकाभिमुख कार्यपद्धतीचा भाग असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!