वडझरीला भोजापुर चारीचे पाणी मिळाले नाही तर रास्ता रोको आंदोलन !
सर्व ग्रामस्थांचा इशारा ; ग्रामपंचायतचा ठराव
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 31
भोजापुर चारीचे पाणी संगमनेर तालुक्यातील वडझरी गावातील बंधारे भरण्यासाठी न सोडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे ग्रामपंचायत मध्ये तसा ठरावही करण्यात आला आहे.

पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडझरी गावातील शेतकरी निळवंडे व भोजापूर पाण्यापासुन गेली 40 वर्ष वंचित आहेत. भोजापूर चारीचे पाणी हे टेल पासून म्हणजेच वडझरी गावातून बंधारे भरणे अपेक्षित असताना जलसंपदा विभागाची यंत्रणा चुकीच्या लोकांच्या आदेशाने काम करत असुन भोजापूर चारी चे पाणी आडमध्ये फोडले गेले आहे. हे नियमाला धरून नाही.

भोजापुर चारी पासून ते गोगलगाव पर्यंत जुन्या काळात चारी झालेली असून सदर चारीचे क्षेत्र जलसंपदा खात्याकडे वर्ग आहे तिगाव माथ्यापासून वडझरीपर्यंत चारी उपलब्ध असून थोडीशी डागडुजी केली तरीआमच्या हक्काचे आमच्या बंधाऱ्यापर्यंत येईल आणि तो आमचा हक्कच आहे. परंतू जाणून बुजून वडझरीला टाळण्यासाठी काही तथाकथीत राजकारणी वडझरीचे नाव घेताना दिसत नाहीत व अधिकाऱ्यांना चुकीचे काम करण्यास भाग पाडत आहेत.
याविषयी फार मोठे राजकारण होत आहे ज्यांचा खऱ्या अर्थाने पाण्यासाठी सातत्याने संघर्ष आहे अशा गावांना जाणून बुजून वंचित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ज्यांचा चारीच्या पाण्याविषयी कवडीचाही संबंध नाही असे लोक जलनायक होऊ पाहत आहेत. निळवंडे भोजपुर संघर्ष सुरू असताना आमच्याच गावाने आपले तिगावमाथा व सोनोशी येथे टेम्पो भरून माणसे नेऊन कार्यक्रम घेतले त्या वेळेला साथ न देणारे आज राजकीय कुरघोड्या करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणास आमचा पाण्यासाठीचा संघर्ष माहित असून आम्ही केलेले अनेक आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको, पुतळे दहन यातून आमच्या कार्यकर्त्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
याच कारणाने निळवंडेचे पाणी आम्हाला मिळू दिले नाही. आमचे राजकारण फक्त पाण्यासाठी आहे. आम्हाला पाणी सोडून कुठलीही राजकीय अभिलाषा नाही. जलसंपदा खाते आपल्याकडे असल्या कारणाने आपण आपले अधिकार वापरून वडझरी बंधाऱ्यात पाणी सोडून त्याचे जलपूजन करावे आणि जाणून-बुजून वंचित ठेवलेल्या, सातत्याने संघर्ष केलेल्या शेतकन्यांना न्याय द्यावा. अन्यथा यावेळेस आम्हाला पाणी मिळाले नाही तर पुन्हा एकदा पाण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी वडझरिमध्ये तळेगाव- लोणी रस्त्यावर आम्ही सर्वशेतकरी बायका मुलांसह सर्व जनावरे अवजारे घेऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. असा इशाराही निवेदनात शेवटी दिला आहे.
