संगमनेर मध्ये लवकरच दिव्यांग भवन — आमदार अमोल खताळ 

दिव्यांग प्रमाणपत्र व साहित्याचे वाटप

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 14

संगमनेरमध्ये दिव्यांग भवन व्हावे ही अनेक दिवसाची दिव्यांग बांधवांची मागणी होती. त्यानुसार नगर पालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.

संगमनेर शहरातील गणेश नगर येथील योग भवनात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात पाय कॅलिपर्स बसविणे तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आमदार खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरीया, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, दिव्यांग साह्यसेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, माझ्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यातूनच दिव्यांग बांधवांच्या गरजांची खरी ओळख झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून माजी खा. डॉ सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यात वयोश्री’ योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचलो. शासनाच्या अनेक योजना पारदर्शकतेने आपण राबवत आहोत. कुणाला कोणत्याही कामासाठी पैसे देऊ नका त्यासाठी माझेआणि पालक मंत्र्यांचे कार्यालय, तसेच विळद फाउंडेशन’ तुमच्या साठी नेहमीच खुले राहील असे आमदार खताळ यांनी सांगितले.

आपण फक्त निवडणुकी राजकारण करत असतो मात्र निवडणुका संपल्या की समाजकारण करत असतो. दिव्यांग, वंचित आणि गरजवंतांना न्याय मिळावा, तसेच त्यांच्यासाठी शासनाच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमा तून सर्वतोपरी मदत पोहोचवली जावी हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. सर्व दिव्यांग बांधवांचे माझ्यावर प्रेम आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी या तालुक्याचा आमदार झालो आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा काही अडचणी येतील त्या वेळी तुमचा भाऊ, तुमचा मुलगा २४ तास तास तुमच्या पाठीशी भक्कम उभा राहील असा विश्वास आमदार खताळ यांनी दिव्यांग बंधू-भगिनींना दिला.

यावेळी पाच प्राथमिक दिव्यांग बांधवांना कॅलिपर्स तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले तर आभार विनोद सूर्यवंशी यांनी मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!