व्रत विवेक…..

व्रत म्हणजे विशिष्ट नियमांनुसार काही काळ, काही विशिष्ट गोष्टी करणे किंवा न करणे. हे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालनासाठी केलेले आचरण असते. जर आपण एखादे व्रत पाळत असू, पण ते पूर्ण नियमाने न पाळल्यास त्याला व्रतवैकल्य म्हणतात. “वैकल्य” म्हणजे विकार, दोष, अपूर्णता, किंवा कमतरता. अनेकदा व्रत वैकल्यामध्ये उपवास, विशिष्ट आहार, पूजा-अर्चा, ध्यान आणि अन्य धार्मिक विधी यांचा समावेश असतो. धर्म, श्रद्धा आणि इच्छा या अत्यंत वैयक्तिक बाबी असतात. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा आणि आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आपण काय वागत आहोत, त्याचा विचार प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून करून योग्य ते आचरण करणे सुद्धा गरजेचे असते. व्रत हे विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीस, विशिष्ट वाराला, विशिष्ट महिन्यात किंवा विशिष्ट पर्वाला आचरले जाते. व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम अशा सर्व प्रकारच्या धर्मांत आढळतात. या व्रत वैकल्यचे अनेक प्रकार सुद्धा असतात. आधुनिक काळात या व्रत वैकल्यांकडे शास्त्रीय, तार्किक व चिकित्सक दृष्टीने पाहणे गरजेचे बनले आहे.

अनेक लोकांना उपवास किंवा व्रत का केले आहे असे विचारले असता ते, “मला खिचडी खायला आवडते, पोटाला आराम म्हणून” अशीही उत्तरे येतात. पण अनेकदा पोटाला आराम न मिळता एकादशी, दुप्पट खाशी असेच होताना दिसून येते. लोक व्रत का करतात यामागील अजून काही कारणे पाहिली असता, काही इच्छा पूर्ण होण्याकरिता, काही अडचण संकट त्रास दूर होण्यासाठी, सगळेच करतात म्हणून, केलेलं चांगल असत म्हणून… अशी कारणे दिसून येतात. म्हणजेच विशिष्ट व्रत करण्यामागचा एखाद्याचा उद्देश हा अनेकदा अत्यंत अशास्त्रीय व अतार्किक असतो. एखादा उपवास केला म्हणून कोणतीही इच्छा पूर्ण होत नसते किंवा काम होत नसते. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. ज्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात. हे सर्वांना माहित असूनही अनेक वर्षापासून चालत आले आहे म्हणून लोक अंधानुकरण करीत असतात. प्रत्येकाने आपण विशिष्ट व्रत का करीत आहोत, त्यामागील विचार स्पष्ट करावा आणि मगच ते व्रत करायचे का नाही हे ठरवावे.

उपवासाला साबुदानाच का चालतो? तर काही ठिकाणी,काही लोकांना उपवासात पोहेही चालतात, ठराविक पदार्थच का खाल्ले जातात याचे काहीही विशेष कारण सापडत नाही. काही लोक प्रत्येक गोष्टीच्या मागे शास्त्र असत, अस अगदी ठामपणे सांगतात. पण काय आहे या मागचे शास्त्र आणि ते पुरावे देवून सिद्ध करा असे म्हणाले असता कोणालाही काहीही सांगता येत नाही.

व्रत करण्याचे काही फायदे सुद्धा होऊ शकतात. व्रत केल्याने फक्त तोटेच होतात असे नाही. पण तुलनात्मक दृष्टीने पाहता तोटेच जास्त होताना दिसून येतात. उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो. काहीजण मौन व्रत करतात त्याने मनशांती आत्मनियंत्रण संयम या गोष्टी होण्यास मदत होते. काही व्रतांमुळे काही कौटुंबिक सामाजिक कार्यक्रम भेटीगाठी सुद्धा होतात. सर्व लोक एकत्र येतात. मनोरंजन होते. असे नकळत फायदेही आहेत. परंतु असे दिसून येते कि , बहुतांश व्रत वैकल्ये ही स्त्रियांनाच सांगितली जातात. चांगला नवरा मिळावा म्हणून, किंवा आहे तो नवरा सात जन्म मिळावा म्हणून,(कितीही वाईट वागत असला तरीही) नवरा खूप जगावा म्हणून, मुल व्हाव म्हणून, इत्यादी अनेक कारणांसाठी स्त्रिया व्रत करताना दिसून येतात. पूर्वीच्या काळी स्त्रियांचे आयुष्य हे अत्यंत कष्टाचे घरातच चूल आणि मुल यात गुरफटलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात बंदिस्तपणा एकसुरीपणा असायचा. त्यातून बाहेर पाडण्यासाठी, मनोरंजनासाठी, इतर महिलांच्या गाठी भेटी व्हाव्यात म्हणून व्रतवैकल्यांची निर्मिती झालेली असावी. आत्ताच्या काळात सुद्धा अनेक महिला स्वेच्छ्येने व्रत वैकल्य करताना दिसून येतात. परंतु त्याच सोबत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे काही सामाजिक कौटुंबिक दबाव सुद्धा असतो. जस कि ‘तू वटपोर्णिमेच व्रत करत नाहीस का?, याचा अर्थ हिच हिच्या नवर्यावर प्रेम नाही.’

इच्छापुर्तिचा आणि व्रताचा काहीही संबंध नसतो. एखादे व्रत पूर्ण केल्याने मनोकामना पूर्ण होते हि खूप मोठी अंधश्रद्धा स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्या विषयाशी संबंधित विशिष्ट प्रयत्न केल्याने एखादे कार्य घडते. एकवेळ पुजा अर्चा व्रत या गोष्टीनी फक्त मानसिक आधार व समाधान लाभू शकते. परंतु गोष्टींचा मूळ कार्यकारण भाव समजून त्या दिशेने प्रयत्न करणे मुळात गरजेचे असते. एखादे व्रत करण्यात अडचण आली तर लगेच आता पाप लागेल, काहीतरी संकट येईल असा विचार करून काही लोक आत्मविश्वास गमावून बसतात किंवा नकारात्मक विचार सुद्धा करतात.

काही व्रते करताना निसर्ग, पर्यावरण यांचे संरक्षण करायचे सोडून आपण त्यास हानी तर पोहोचवत नाही ना हा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. वटपौर्णिमेला वटसावित्रीच्या पूजेमुळे वडाच्या वृक्षाच्या मुळाशी दुध साखर केमिकल युक्त कुंकू हळद यामुळे या वृक्षाचे अजूनच नुकसान होते. अनेकदा पुजेसाठी याच्या फांद्या तोडल्या जातात. मोठ्या प्रमाणात या वृक्षाभोवती दोर गुंडाळला गेल्यामुळे याच्या वाढीला ताण येतो. एका ठिकाणी तर पुजेसाठी आणलेल्या दिव्यामुळे वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोरीला मोठी आग लागली आणि त्या गोंधळात पळापळीत काही महिला जखमी झाल्या. झाडाचे सुद्धा खूप नुकसान झाले.

जर आपण असे मानले कि देव असतो तरी सुद्धा, कोणत्या देवाला पर्यावरणाचे निसर्गाचे नुकसान झालेले आवडेल का? त्याच्या कोणत्या भक्ताला व्रत केल्यामुळे त्रास झालेला आवडेल का? आणि व्रत केले नाही म्हणून किंवा व्रत वैकल्य केले म्हणून कोप होवून बदला किंवा सूड भक्ता कडून कोणता देव घेईल का? असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात पडत असतात. परंतु आपण आपली विवेकबुद्धी जागृत न ठेवता त्याकडे कानाडोळा करतो हे थांबवायला हवे. आधुनिक काळात धकाधकीचे आयुष्य जगत नोकरी करणाऱ्या बायकांना व्रत करणे अत्यंत कठीण असते. अनेक उपास तापास केल्यामुळे स्त्रियांमध्ये अशक्तपणा, कुपोषण, रक्त कमी होणे अशा अनेक वैद्यकीय समस्या दिसून येतात. त्यामुळे व्रत केल्यामुळे स्त्रियांना काहीही फायदा न होता असंख्य तोटेच होताना दिसून येतात. आयुष्यभर त्या स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करत असतात. म्हणून आधुनिक काळात खास करून स्त्रियांनी व्रतवैकल्य कडे बारकाईने विचार करून त्याचे हेतू उद्देश यांचा शास्त्रीय आणि तार्किक विचार करावा. समाजातील गरजा आणि समस्या दूर करण्यासाठी समाजकार्याचे व्रत आपण घ्यावे. गरजू लोकांना मदत करणे, समाजात समानता व न्याय प्रस्थापित करणे, सामुदायिक विकास, मानवाधिकार संरक्षण, पर्यावरण संरक्षण अशा प्रकारचे व्रत घेणे जास्त संयुक्तिक ठरेल.

डॉ. अस्मिता बालगावकर,

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सोलापूर जिल्हा.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!