राजूर कावीळ साथीमुळे लहामटेंच्या ढोंगी विकासाचा बुरखा फाटला : माकप

 संगमनेर प्रतिनिधी दिनांक 3 

राजूर येथील भयावह कावीळ साथीमुळे संपूर्ण राजुरकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजूर हे आदिवासी भागाची मुख्य बाजारपेठ असल्याने संपूर्ण आदिवासी भागाचे आरोग्यही या साथीमुळे धोक्यात आले आहे. आज पर्यंत दोन रुग्णांना कावीळ अ या आजाराने आपला जीव गमवावा लागला असून शेकडो रुग्ण जीवन मरणाशी झुंज देत आहेत. दूषित पाण्याचा दीर्घकाळ पुरवठा झाल्यामुळे संपूर्ण शहरात कावीळ या आजाराने थैमान घातले आहे. लागण झालेल्या कमी वयातील व बालवयातील रुग्ण तातडीने अत्यावस्त होत असून नागरिकांमध्ये यामुळे अत्यंत भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.

राजूर ग्रामपंचायत डॉ. लहामटे यांच्या ताब्यात असून ते स्वतःही राजुर येथे वास्तव्यास आहेत. उठता बसता अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या जात असताना या बैठकांमध्ये केवळ ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा आर्थिक देवाणघेवाण करण्याचाच आढावा घेतला जातो का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी आणि आरोग्य याबाबत डॉक्टर असलेल्या आमदारांकडून असे दुर्लक्ष होणार असेल तर त्यांचे विकासाचे मॉडेल किती निकृष्ट आहे हे यावरून सिद्ध होते.

चार रस्ते केले व एक बस स्थानक सजवले म्हणजे विकास झाला असे होत नसते. राजुर सारख्या बाजारपेठेच्या गावातली टाकी वर्षानुवर्ष साफ केली जात नाही. त्यात सडलेले प्राणी, कचरा आणि घाण सातत्याने सडत राहते. सडलेले दूषित पाणी नागरिकांना पुरविले जाते. जी ग्रामपंचायत आमदारांच्या ताब्यात आहे त्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व आरोग्याच्या बाबत ही अवस्था असेल तर तालुका भर काय परिस्थिती असेल याचा यावरून अंदाज बांधता येतो. जलजीवन योजनेच्या कामांमध्ये तालुका भर मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचारामध्ये तालुक्यातील सत्ताधारी मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. विकासाचे हे मॉडेल खरे तर भ्रष्टाचाराचे मॉडेल बनले आहे.

ग्रामसेवकांना निलंबित करून, झालेल्या घटनेबाबत पुरेसा न्याय होणार नाही. आमदार लहामटे यांनीच या संपूर्ण अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे. जनतेची माफी मागितली पाहिजे.

उठता बसता सोशल मीडियावर जनता दरबाराचे फोटो टाकून आपली पाठ थोपटून घेताना, आपल्या खुर्ची खाली किती अंधार आहे हे डॉक्टर लहामटे यांनी या निमित्ताने पाहून आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांनी हे असे आत्मपरीक्षण करावे व चूक मान्य करून जनतेची माफी मागावी तसेच स्वतःची पाठ थापटून घेणे थांबवत संपूर्ण मतदारसंघभर जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

प्रसिद्धी पत्रकावर कॉम्रेड सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, प्रकाश साबळे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, वसंत वाघ, लक्ष्मण घोडे, सुनील बांडे, दत्ता कोंढार बहरू रेंगडे, अर्जुन गंभीरे यांची नावे आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!