निळवंडे पाण्याच्या अडून काहींचा राजकारण करण्याचा प्रयत्न – आमदार खताळ
निळवंडे, खताळ यांनी मांडली रोखठोक भूमिका
संगमनेर प्रतिनिधी दि. 7
ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणताही मुद्दे शिल्लक राहिले नाही. तेच आता आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून हेतूपुरस्सर शेतकऱ्यांत दिशाभूल करणारे वातावरण तयार करत त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलीन करत या निळवंडे पाण्याच्या अडून काहीजण राजकारण करत असल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला आहे.

संगमनेर तालुक्यात निळवंडेचे पाणी पेटले या मुद्द्यावरती खताळ म्हणाले, की यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्याला आवर्तन सोडले होते. त्या वेळी कोणतीही अडचण न येता सर्वांना पाणी मिळाले होते. मात्र यावेळी सुद्धा दोन्ही कालव्यांना व्यवस्थित पाणी चालू होते. हेड ते टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले होते.
उजव्या कालव्याचे पाणी राहुरी तालुक्या मध्ये अजून पोहोचले नाही. परंतु कालव्या मध्ये एक-दोन पाईप टाकून पुढे नाले बंधारे भरण्याचे काम सुरू होते. मात्र काहींनी शेतकऱ्यांना भडकावून देत त्या कालव्यांमध्ये जास्त पाईप टाकून पाण्यावरच राजकारण सुरू केले हे दुर्दैवी आहे.

निळवंडे उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे ही आपली पहिल्या पासून भूमिका आहे. संगमनेर तालुक्यातील दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावातील ओढे नाले छोटे मोठे पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. गरज पडल्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाठपुरावा करून ४ ते ५ दिवसाचे रोटेशन वाढवूनही प्रत्येकाला पाणी कसे मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. ज्या शेतकऱ्यांच्या मतावर मी निवडून आलो आहे त्यांना मी कदापिही वाऱ्यावर सोडणार नाही आणि पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. असेही आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
