नागरिकांचा पैसा उधळू नका ! 

संगमनेर पालिकेला जनतेचे आवाहन !!

 

सिग्नल, पेव्हिंग ब्लॉक, सर्कल, कारंजे, स्वच्छतागृहे यांच्या मुळे झाले कोट्यवधींचे नुकसान…

 

खास प्रतिनिधी —

(भाग १)

 

प्रसिद्धीच्या हव्यासापायी संगमनेर नगरपालिकेने नागरिकांच्या पैशाची नुकसान करू नये. सहजासहजी निधी मिळतो म्हणून पैसा उधळू नका. काटकसरीने काम करा. ठेकेदारांच्या आहारी जाऊ नका.

अशा अपेक्षा संगमनेरच्या सुज्ञ नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहेत.

नगरपालिकेने राबवलेल्या शहरातील विविध योजनांमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. यातून कुठलाही धडा न घेता नगरपालिका पुन्हा तसेच प्रकार करत आहे.

संगमनेर शहरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, सर्कल, कारंजे चौकाचौकात बसवणे, गुप्त झालेली सिग्नल यंत्रणा आणि याच बरोबर विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारती या सर्व बाबींमध्ये कुठल्याही प्रकारे नियमांची, तांत्रिक विभागाची खात्री न करता केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी आणि ठेकेदारांचे भले करण्यासाठी योजना राबवल्या. यातून मात्र पालिकेने जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घातले असल्याचे आरोप आता होत आहेत.

संगमनेर नगरपालिकेने शहराच्या विकासात भर घालताना काही नवीन प्रकल्प राबवले. मात्र हे प्रकल्प राबवताना आघाश्या सारखी घाई केल्याने, प्रकल्पाची पूर्ण माहिती, सर्वेक्षण न करता फक्त प्रसिद्धीसाठी उद्घाटन केल्याने संगमनेर नगरपालिकेचे बऱ्याच ठिकाणी मोठे आर्थिक नुकसान झाले.

काही प्रकल्प अर्ध्यावरच बंद पडले. काही प्रकल्प पूर्ण होऊनही बंद करावे लागले. असा प्रकार पालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे झाला आहे. यामध्ये पालिकेचे पर्यायाने जनतेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

सुसंस्कृत आणि संस्कारित संगमनेरला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कृपाशीर्वादाने वेळोवेळी मोठा आर्थिक निधी मिळत असला तरी या निधीचा वापर काटकसरीने आणि व्यवस्थित व्हायला हवा.

तसे होताना दिसले नाही.आर्थिक नुकसान होत असून देखील असे प्रकल्प का राबवतात. हाच प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे.

सिग्नल यंत्रणेची वाट लावली…

काही वर्षांपूर्वी कुठल्याही प्रकारची खात्री न करता, तांत्रिक बाबींची माहिती न घेता, व्यवस्थित सर्वेक्षण न करता, तज्ज्ञांची मते न घेता फक्त संगमनेर शहर ‘झगामगा’ करायचे म्हणून शहरात वाहतूक सिग्नल व्यवस्था उभी करण्याचे ठरले. कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून ही आयडियाची कल्पना बाहेर आली. सत्ताधाऱ्यांनी ती उचलून धरली. आणि लाखो रुपये खर्च करून शहरातल्या महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकात सिग्नल यंत्रणा उभी केली. यंत्रणा चालू केल्यानंतर बराच काळ ती चालू बंद – चालू बंद अवस्थेत होती. नंतर ती कायमस्वरूपी बंद पडली. आणि आता त्या चौकां मधून आणि रस्त्यांवरून ही सिग्नल यंत्रणा कायमची गायब झाली आहे. इतिहास जमा झाली आहे. या यंत्रणेसाठी पालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला. प्रसिद्धी केली. बाता मारल्या. मात्र नागरिकांचे व्हायचे ते नुकसान झालेच.

(क्रमशः)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!