समाजात धार्मिक उपद्रव करणाऱ्यांवर कारवाई केली तर खरा आनंद होईल !

पंतप्रधान मोदींच्या ‘सौगात ए मोदी’ उपक्रमाला मुस्लिम समाजाचे पत्र…

संगमनेर प्रतिनिधी दि. 30

मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमावरून देशात सध्या राजकीय वाद सुरू आहेत. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे. हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

‘सौगात ए मोदी’ उपक्रमांतर्गत मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त भेटवस्तू देण्यात येत आहेत. यावरून विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी टीका केली आहे. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

संगमनेरमधील मुस्लिम बांधवांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “आपला भारत देश विविधतेने नटलेला असून सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.

राम आणि रहीम यांची संस्कृती जपणारा हा देश आहे. आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर कोणताही कटुतेचा भाव न ठेवता रमजान महिन्यात ‘सौगात ए ईद’ उपक्रमासाठी पुढाकार घेतला, याचे आम्हाला अभिनंदन करावेसे वाटते.”

मात्र, या पत्रात मुस्लिम समाजाने पंतप्रधान मोदींकडे एक मागणीही केली आहे. “आपण दिलेली भेट आम्ही स्वीकारणार आहोत, परंतु समाजात द्वेष पसरवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे. समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांना कोणताही धर्म नसतो. त्यांच्यावर कारवाई केल्यास आम्हाला खरा आनंद होईल,” असे या पत्रात म्हटले आहे.

शुक्रवारी (२८ मार्च) संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आले आहे. हे पत्र देताना संगमनेरचे मुस्लिम धर्मगुरू शहर काझी अब्दुल रकीब अब्दुल वाहब पिरजादे, पत्रकार शौकत पठाण, अझीज ओव्होरा, साजिद शेख, शाहरुख शेख, इस्माईल शेख, जावेद शेख, जमीर शेख, आसिफ शेख, सालार मिर्झा, शोएब खान आदी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!