राजकीय स्वार्थासाठी धर्मांध शक्तींकडून महाराष्ट्रात दंगली पेटविल्या जात आहेत : माकप 

प्रतिनिधी दि. 18 —

जनतेचे रोजी रोटीचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी व आपला धर्मांध अजेंडा पुढे रेटण्यासाठी राज्यात धर्मांध शक्तींकडून सुनियोजित कट करण्यात आला आहे. रोज धार्मिक तेढ वाढविणारी केली जाणारी विधाने व पेटविल्या जाणाऱ्या दंगली या कारस्थानांचा भाग आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने या कठीण काळात आपला संयम व विवेक शाबूत ठेवत शांतता बाळगावी व धर्मांध कारस्थानांपासून दूर राहावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले आहे .

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे मंत्री रोज धार्मिक तेढ वाढविणारी विधाने करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा आपल्याला पाठींबा असल्याने आपले कुणीही काहीही करू शकत नाही असे सांगत आहेत. राज्यात आपलीच सत्ता असल्याने आपण कसेही वागलो तरी घाबरण्याचे कारण नाही असे सांगत धर्मांध संघटनांना चेतवीत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा व्यक्ती व संघटनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

नागपूर येथे घडलेली घटना व दंगल राज्यभर अशांतता व धार्मिक ध्रुवीकरण निर्माण करण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे राज्यात धर्मांध शक्तींनी उच्छाद मांडला आहे. नागपूर दंगलीमागेही हेच सुनियोजित कारस्थान आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आपली पक्षपाती भूमिका सोडत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, नागपूर दंगलींची न्यायालयीन चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

राज्य सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात संपूर्ण अपयश आले आहे. निवडणूक केंद्री योजनांमुळे राज्याच्या तिजोरीची संपूर्ण वाट लावण्यात आली आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे. राज्यात यामुळे मोठ्या प्रमाणात शेती, माती, विकास, शिक्षण व रोजगाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेमध्ये यामुळे सरकार विरोधात मोठा असंतोष खदखदतो आहे. जनतेचे लक्ष या असंतोषाकडून इतरत्र वळविण्यासाठी धार्मिक तणाव वाढविला जातो आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सत्ताधाऱ्यांचे हे षड्यंत्र समजून घेत विवेकी भूमिका घ्यावी असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!