संगमनेर शिवजयंती मिरवणूक
शिवसेना ठाकरे – शिंदे गटात राडा
पोलीस उपअधीक्षक आक्रमक : गोंधळ घालणाऱ्यांना कायदेशीर कारवाईची तंबी
दोन्ही गटांना मिरवणूक काढण्यास वेळेनुसार परवानगी
संगमनेर प्रतिनिधी दि. 15
आज पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत शिवजयंतीची मिरवणूक काढण्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार हमरी तुमरी, वादावादी, धक्काबुक्की झाल्याने शांतता समितीच्या बैठकीत काही काळ अशांतता निर्माण झाली.

शिवजयंती मिरवणुकी निमित्त संगमनेर प्रांत कार्यालयाच्या हॉलमध्ये बोलवण्यात आलेल्या शांतता समितीच्या मीटिंगमध्ये दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये राडा झाला. मिरवणूक आधी कोणी काढायची व कोणाच्या मिरवणुकीला परवानगी पाहिजे, यावरून पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी आणि धक्काबुक्की आणि एकमेकांना ढकलाढकली झाली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी कडक भूमिका घेत दोन्ही गटांना समज दिल्यानंतर शांतता समितीच्या बैठकीत शांतता निर्माण झाली.

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची प्रथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार संगमनेर मध्ये प्रथम सुरू करण्यात आली. ही शिवजयंतीची मिरवणूक शिवसेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे आणि पारंपारिक पद्धतीने नगरपालिकेपासून सायंकाळी काढण्यात येते. मागील दोन वर्षापासून शिवसेना शिंदे गट यात आक्रमक झाला असून आम्हालाही परवानगी मिळावी अशी मागणी ते करत आहेत. त्यामुळे नेहमीच वाद होतात. यावेळी असाच वाद निर्माण झाला त्यामुळे शांतता समितीत काही काळ गदारावरही झाला.

थेट कायदेशीर कारवाई केली जाईल –पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये झालेला हा गदारोळ पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या समोरच झाल्याने संतप्त झालेल्या उपाधीक्षकांनी बैठकीला असलेल्या सर्वांना चांगले सुनावले. कोणाचेही पक्षीय मतभेद, गट तट शिवजयंती सारख्या मिरवणुकीत सहन केले जाणार नाहीत. असे वाद करून जर शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणार असाल तर सर्वांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याचे परिणाम काय होतात हे मागचा इतिहास पाहून सर्वांनी ठरवा. त्यामुळे येथून पुढे कोणाची गय न करता कारवाई केली जाईल असा इशारा देत शांतता समितीची बैठक शांततेसाठी असते. वाद न करण्यासाठी असते. त्यामुळे कोणीही वाद न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचरण सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले.
