टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी !

आमदार तांबे – खताळ यांचा आक्रमक पवित्रा 

सर्वपक्षीय संगमनेरकर एकवटले ; प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन 

आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

संगमनेर दि.

नाशिक-पुणे मार्गावर असलेल्या संगमनेरलगतच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. शनिवारी रात्री या टोलनाक्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष असलेले अतुल कासट यांच्यासह त्यांच्या भावांना आणि मित्राला टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत अतुल आणि अमित हे दोघे कासट बंधू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दी विरोधात आज संगमनेरकर एकवटले असून व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय संगमनेरकरांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपींवर कारवाईची तसेच टोल नाका बंद करण्याची मागणी केली.

मोर्चात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि संगमनेरकर सहभागी झाले होते. मोर्चाने आलेल्या संगमनेरकरांनी यासंदर्भात प्रांताधिकारी शैलेंश हिंगे, पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी टोल नाक्या संदर्भात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

संगमनेरचे प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष दिवंगत भाजप नेते राधावल्लभ कासट यांच्या अतुल अमरीश व अमित या तिघा मुलांसह मित्र शैलेश वामन यांना शनिवारी रात्री संगमनेर लगतच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर वाहनांचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघांमध्ये सुरु असलेल्या वादात अचानक टोल कर्मचार्‍यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करुन चौघांवर हल्ला चढवत गुंडागर्दी केली.

दरम्यान यासंदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी जखमी कासट यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील या टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून अनेकांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत.

मात्र हल्लेखोर आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. हल्लेखोरांचे कृत्य सराईत गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने व जखमींना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आरोपींविरोधात 24 तासाच्या आत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. टोल नाका बंद करण्यात यावा. आदी प्रकारच्या मागण्या मोर्चेकरी आंदोलकांनी यावेळी केल्या.

आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, उद्योजक गिरीश मालपाणी, महाराष्ट्र चेंबरचे प्रकाश कलंत्री, गणेश ढोरे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रकाश राठी, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, दिलीप साळगट, सोमनाथ कानकाटे, शिवसेनेचे शहर प्रमुख आप्पा केसेकर, ओंकार भंडारी, अजित मणियार, ओंकार सोमाणी, जावेद जहागीरदार, ज्ञानेश्वर कर्पे, दिनेश फटांगरे, सोमेश्वर दिवटे, राजाभाऊ देशमुख, योगेश जाजु, किशोर नावंदर, श्याम करवा, आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, प्रकाश गायकवाड, वेणूगोपाल लाहोटी, सुदर्शन लाहोटी, अरविंद कासट, सागर बागे, योगेश सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, संभव लोढा, शाम कर्पे, तुषार अरगडे, आदींसह मोठ्या संख्येने संगमनेरकर उपस्थित होते.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!