माजी आमदार थोरात यांचा पराभव जिव्हारी लागला !
महिला ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा
प्रतिनिधी —
विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ हे अनपेक्षित रित्या विजय झाले आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने संगमनेर तालुक्यातील पळसखेडे ग्रामपंचायत सदस्या सोनाली सोमनाथ कांडेकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

पळसखेडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी पळसखेडे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन मधून निवडून आले होते. त्यानंतर वार्डातील व गावातील अनेक विकास कामे केली आहेत. मात्र आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे सर्वेसर्वा नेते बाळासाहेब थोरात यांचा दुर्दैवाने पराभव झाला. त्यामुळे माझ्या तो अत्यंत जिव्हारी लागला आहे. मी शब्दात सांगू शकत नाही असे दुःख मला झाले आहे. त्यामुळे मी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

ग्रामपंचायत सदस्य कांडेकर यांनी त्यांचा राजीनामा ग्रामसेवकाकडे सुपूर्द केला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. माजी आमदार थोरात यांच्या पराभवामुळे मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खूपच हळहळ व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. थोरात यांचा पराभव हा अनेकांना धक्कादायक वाटत असून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

