संगमनेर विधानसभा 

आमदार थोरात यांच्या विरोधी उमेदवारांविषयी नेहमीच शंका !

आमदार थोरात यांचाच छुपा मास्टर प्लॅन ?

 

खताळ पाटील काँग्रेस बरोबर ! 

माजी मंत्री, राज्याच्या राजकारणातील तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या विषयी संगमनेर तालुक्यात आजही आदराचे स्थान आहे असे बीजे खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील यांनी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. थोरात विरोधी असणारे खताळ अचानकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करते का झाले हा चर्चेचा विषय ठरला असून खताळ पाटील परिवाराचा विरोधकांवर आणि त्यांना साथ करणाऱ्या तथाकथित नेत्यांवर विश्वास राहिला नसल्याचे हे चिन्ह असल्याचे बोलले जात आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त आमदार थोरात यांच्याविरुद्ध प्रत्येक निवडणुकीला प्यादे उभे करायचे आणि नंतर सेटलमेंट करून घ्यायची अशी चर्चा मतदारसंघात असली तरी बीजे खताळ पाटलांचे नातू विक्रमसिंह खताळ पाटील काँग्रेस मध्ये गेल्याने बऱ्याच राजकीय कुरघोड्या आणि छुप्या युत्यांचा उलगडा होऊ शकतो. आजोबांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाचा फायदा आणि आधार विक्रमसिंह खताळ पाटील यांना भविष्यात नक्कीच होऊ शकतो.

 

प्रतिनिधी —

आमदार बाळासाहेब थोरात हे आपल्या समोरचा उमेदवार स्वतःच ठरवतात आणि कोण आपल्याविरुद्ध निवडणूक लढवेल आणि कोणाविरुद्ध निवडणूक सोपी जाईल याची सर्व तयारी आधीच करून ठेवतात. त्यांना हवा तसा उमेदवार समोरच्या पक्षाकडून नेहमीच मिळत आलेला असतो अशी चर्चा देखील या विधानसभा मतदारसंघात नेहमीच झालेली आहे. त्यामुळे नेमका विरोधी उमेदवार कोणाचा ? हा देखील संशोधनाचा भाग असून उमेदवाराच्या पाठीशी असलेले काही नेते अचानकपणे निवडणुकीतून गायब झाले असून त्यांची यंत्रणादेखील ठप्प झाली असल्याचे दिसून येत आहे.

संगमनेर विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता प्रत्येक वेळी जे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उभे राहिले त्यांच्याविषयी देखील नेहमीच उलट सुलट चर्चा झालेल्या आहेत. आरोप प्रत्यारोप देखील झालेले आहेत. विशेषतः आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर देखील आरोप झालेले आहेत. या आरोपांबाबत थोरात यांनी कधीही कुठलीच प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. मौन बाळगले आहे. त्यांचे मौन आणि त्यांच्याविरुद्ध लढलेल्या उमेदवारांची निवडणुका नंतरची भूमिका, याचे परीक्षण केले तर या आरोपांमध्ये तथ्य आहे की काय अशी शंका येऊ लागते.

निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात टीव्ही TV चालवण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा टीव्ही सुरू करण्याच्या कार्यपद्धतीत पुन्हा सुधारणा करून यंदाच्या निवडणुकीत देखील टीव्ही लावण्यात येतो का काय अशी शंका मतदारांमध्ये असून उगाच कशाला सत्ताधाऱ्यांचे वैर घ्यायचे अशाही भावना व्यक्त होतात. उभे असलेले विरोधी उमेदवार देखील कुठे एका पक्षाशी निष्ठावंत आहेत ? आणि त्यांचे नेते पाहता भविष्यात निष्ठावंत राहतील त्याची खात्री काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. आमदार थोरात यांच्याशी छुप्या युत्या करणारे आणि दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणाऱ्या नेत्यांमुळे संगमनेरमध्ये विरोधक नावाला उरलेले नाहीत. जी काही 40-50 हजार मते आहेत ती वेगवेगळ्या विरोधकांची आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची एकत्र करून गोळा होतात. त्यामुळे आमदार थोरात यांच्या विरोधात विरोधक खरेच निवडणूक जिंकण्यासाठी उभे आहेत की त्यांना निवडणूक सोपी करण्यासाठी ? हा एक सखोल संशोधनाचा विषय झाला आहे.

आमदार थोरात यांच्या 40 वर्षीय राजकीय इतिहासाची पाहणी करता असेच आढळून आले आहे की, अगदी छोटे अपवाद वगळता आमदार थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढलेले उमेदवार एक तर त्यांचे सहकारी होते, त्यांच्या पक्षात काम केलेले होते, त्यांचे छुपे समर्थक होते किंवा त्यांच्याशी छुपे संबंध असलेले होते असे नेहमीच बोलले गेले. त्यामुळे आमदार थोरात यांच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवार नेमके कोणाचे हा प्रश्न नेहमीच जनतेला पडलेला असतो. आणि आपल्याविरुद्धचा उमेदवार आमदार थोरात स्वतः निवडतात हा त्यांचा सर्वश्रुत राजकीय मास्टर प्लॅन असतो अशी देखील चर्चा नेहमीच मतदान संघात होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!