मंत्री विखेंच्या उलट्या बोंबा…
वाळू तस्करी करणारे आरोपी स्वतःच्या व्यासपीठावर… टीका मात्र आमदार थोरातांवर
प्रतिनिधी —
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री हे संगमनेरात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सभा घेत फिरत आहेत. या सभांमध्ये त्यांच्या व्यासपीठावर वाळू चोरी तस्करीचे गुन्हे दाखल असलेले पदाधिकारी अगदी खांद्याला खांदा लावून बसलेले असताना विखे पाटील मात्र आमदार थोरात यांच्यावर वाळू तस्करी संदर्भात टीका करतात, हे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

चाळीस वर्षाच्या कार्यकाळात फक्त वाळू माफियाच सुजलाम सुफलाम झाले असल्याची जहरी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी वरील आरोप करीत विखे पाटील यांचे पितळ उघडे पाडले आहे.

वाळू तस्करी करताना पकडलेले आणि गुन्हे दाखल झालेले राजकीय पक्षांचे पदाधिकारीच विखे पाटील यांच्यासह व्यासपीठांवर त्यांच्या खांद्याला खांदा लावून मिरवत आहेत. अशा तस्करांना बरोबर घेऊन विखे पाटील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. त्यामुळे या चोराच्या उलट्या बोंबा असून वाळू तस्करी करणाऱ्यांचे खरे रखवालदार हे पालकमंत्री असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

विखे पाटील महसूलमंत्री झाल्यापासून फक्त वाळू तस्करीवरच बोलत आहेत. राज्यात त्यांनी उभे केलेले वाळू धोरण पूर्णपणे फसलेले आहे. वाळू तस्करी थांबलेली नाही. अडीच वर्षात संपूर्ण नगर जिल्ह्यात वाळू तस्करीने उच्छाद मांडला असून वाळू माफिया हे विखे पाटलांच्या अवतीभवती असतात हे अनेक वेळा दिसून आले आहे. असे असताना विखे पाटील यांना आमदार थोरात यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. ‘मांजर डोळे मिटून दूधपीत असले तरी स्वतःभोवती वाळू तस्कर असल्याचे एकदा तरी डोळे उघडून पाहायला हवे’ असा सल्ला देखील मंत्री विखे पाटील यांना देण्यात आला आहे.

