संगमनेर विधानसभा मतदारसंघ…
चार पक्षाच्या मांडवाखालून आलेले महायुतीचे उमेदवार !
उमेदवारावर विश्वास कसा ठेवायचा ; मतदारांचा सवाल
प्रतिनिधी —
संगमनेर विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी धडाक्यात प्रचार सुरू केला आहे. मात्र त्यांच्या राजकारणाविषयी विविध शंका मतदारांमधून व्यक्त केल्या जात असून खताळ हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, भाजप अशा पक्षांच्या मांडवाखाली जाऊन आले असल्याने आणि आता शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळण्याआधी ते भाजपचे खंदे कार्यकर्ते असलेले, भाजपचे निवडणूक प्रमुख या पदावर असलेले अचानकपणे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उभे राहिले आहेत. निवडणुकीसाठी आणि विरोधाला विरोधी राजकारणासाठी, तिकीट मिळवण्यासाठी कुठलीही पक्षनिष्ठा, नैतिकता न ठेवणाऱ्या उमेदवारावर विश्वास ठेवायचा कसा ? उमेदवाराचे नेते हे देखील विविध पक्ष बदलून फक्त सत्ता मिळेल तिकडे जाणारे असल्याने उमेदवारही तसेच वागत आहेत का ? असे विविध सवाल मतदारांनी उपस्थित केले आहेत.

संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेदवारी मिळण्याआधी भारतीय जनता पक्षाचे संगमनेर तालुका निवडणूक प्रमुख आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खास कार्यकर्ते असलेले अमोल खताळ यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आहे.

विद्यमान आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध त्यांची लढत आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने देखील संगमनेर मतदार संघात उमेदवार उभा केला आहे. इतरही उमेदवार उभे आहेत. असे असले तरी खताळ – थोरात अशी लढत (?) होईल का याबाबत उलट सुलट चर्चा सध्या मतदारांमध्ये सुरू आहेत.

अमोल खताळ हे यापूर्वी जुन्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. या पक्षात असलेल्या नेत्यांशी त्यांचे धनिष्ठ संबंध होते आणि ते पक्षाचे काम निष्ठेने करीत होते. हे सर्व तालुक्याला माहित आहे. त्यानंतर ते संगमनेरच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात गेले. काँग्रेस पक्षात असताना कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी विविध आंदोलने देखील केली. नंतर मात्र काँग्रेस पक्षात त्यांचे मन रमले नाही. त्यानंतर ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर त्यांना विविध पदे देखील मिळाली. या पदावर असतानाच त्यांना आता शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट देखील मिळाले आहे. या साठी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला नाही की शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला नाही. विखेंच्या कृपेने थेट तिकीट मिळाले. या सर्व प्रकारामुळे खताळ यांच्या विषयी मतदारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत असून आधीच उमेदवार एवढ्या पक्षांमध्ये फिरून आला असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा असावा सवाल सुज्ञ मतदारांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे खताळ हे पालकमंत्री विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे विखे पाटील यांच्या पक्ष बदलण्याचा इतिहास संपूर्ण राज्याला माहित आहे. विखे पाटील यांनी देखील अनेक वेळा पक्ष बदललेला आहे. त्यामुळे ‘जसा नेता तसा कार्यकर्ता’ असा प्रकार आहे की काय ? अशी शंका सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे अश्या पक्ष बदलू व्यक्तींवर किती विश्वास ठेवायचा हा देखील संशोधनाचा विषय आहे. आधीचे पक्ष का सोडले याचे देखील कारण गुलदस्त्यात आहे. नेमका कोणत्या कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यात आला ? त्यानंतर काँग्रेस पक्ष सोडण्यात आला त्यानंतर भाजपमध्ये असताना शिवसेनेचे टिकीट घेण्यात आले, मग भाजप का सोडला ? याबद्दल कुठलाही खुलासा होत नसल्याने उमेदवाराविषयी मतदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे.

विखेंचा फक्त थोरात विरोध …. !
अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात पालकमंत्री विखे पाटील यांचा आमदार थोरात यांच्या विषयीचा व्यक्ती द्वेष कारणीभूत असल्याची टीका होत आहे. आधी आमदार थोरात यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे त्यांना उभे करण्याची वल्गना करण्यात आली होती. मात्र आमदार थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्या वर अशलाघ्य टीका झाल्या नंतर त्यांना या मतदारसंघातून पळ काढावा लागला. म्हणून विखेंच्या हाताखालचाच माणूस उमेदवार घ्यायचा असल्याने खताळ यांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संगमनेर मतदार संघात राजकारण न करता फक्त व्यक्ती द्वेषाने विरोधाला विरोध करणे असा प्रकार चालू असल्याचे चित्र आहे.

