स्वर्गीय इंदिरा गांधी भारताचे कणखर नेतृत्व — आमदार थोरात
प्रतिनिधी–
बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते .देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा दबधबा निर्माण करणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाचे सर्वात कणखर नेतृत्व ठरले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील शक्ति स्थळावर इंदिरा गांधी यांच्या 40 वा स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते . यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सुधाकर जोशी, आर.बी. राहणे, संतोष हासे, राजेंद्र गुंजाळ, निर्मला राऊत अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर बांगलादेशची निर्मिती करून जगाचा नकाशा बदलण्याचे काम आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी केले आहे. अत्यंत पराक्रमी व धाडसी असलेल्या इंदिरा गांधी यांनी अनेक संस्थांने खालसा केली. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. अणुबॉम्बच्या निर्मितीसह अनेक उपग्रह अवकाशात सोडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा निर्माण केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सहवास व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संस्कार लाभलेल्या इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकात्मतेमध्ये कधीही तडजोड केली नाही. आणि या देशाची अखंडता टिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांचे योगदान पुढील सर्व पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे
डॉ.तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी कारखाना कार्यस्थळावर इंदिराजी गांधी यांच्या कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी याकरता शक्तिस्थळ निर्माण केले आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादन निमित्त राज्यभरातील विविध मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जातात. गरीबी हटावचा नारा देऊन समाजातील दिनदलीत आणि गोरगरिबांची आई बनलेल्या इंदिरा गांधी यांनी स्त्रियांच्या रक्षणाकरता सुवर्ण मंदिरामध्ये भारतीय सैन्य पाठवले आणि यातूनच खलिस्तानवादी यांचा रोष ओढावून त्यांना स्वतःचा प्राण गमवावा लागला. हे कणखर व्यक्तिमत्व देशवाशीवांसाठी सदैव अभिमानास्पद ठरले आहे.