…. अन्यथा स्वबळावर लढण्याची परवानगी द्या : राज्य नेतृत्वाकडे माकपची मागणी
माकपचे अकोलेत शक्तिप्रदर्शन
प्रतिनिधी —
अकोले विधानसभा मतदारसंघ इतिहास काळापासून डाव्या विचाराचे केंद्र राहिले आहे. 2001 पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या मतदारसंघाची चिकाटीने बांधणी केली आहे. आदिवासी-बिगर आदिवासी- श्रमिक जनतेचे व आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, घरेलू कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, अशा ग्रामीण कामगार- कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे पक्षाने तळागाळापर्यंत मजबूत संघटनात्मक जाळे विणले आहे. जल, जंगल, जमीन,सिंचन,रोजगार, शिक्षण, शेतीमालाचे हमीभाव व विकासाच्या मुद्द्यांवर आरपारचे यशस्वी लढे केले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जन संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी अनेक लढ्यांचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघ नेहमीच अग्रभागी राहिला आहे. शेतकरी कर्जमाफी व दिल्ली येथील झालेल्या विविध आंदोलनांमध्ये सुद्धा अकोले तालुक्यामधील चळवळींनी क्रांतिकारक भूमिका निभावली आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर तळागाळापर्यंत बांधणी असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीने जागा वाटपामध्ये अकोल्याची जागा सोडावी अशी मागणी पक्षाच्या राज्य नेतृत्वाने महाविकास आघाडीकडे केली आहे. निवडणूक अर्ज भरण्याची तारीख जवळ आली तरी याबाबत निर्णय झाला नसल्याने आज शक्ती प्रदर्शन करीत माकपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे ही जागा आग्रहपूर्वक मागितली आहे. महाविकास आघाडी राज्यात माकपला सन्मान जनक जागा सोडत नसेल व अकोल्याची जागा माकपला मिळणार नसेल तर पक्ष नेतृत्वाने ही जागा स्वबळावर लढवण्याची परवानगी आम्हाला द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सचिव मंडळ सदस्य डॉ. अजित नवले, किसन गुजर व सुनील मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अकोले येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या सर्व जन संघटनांच्या सहभागाने मोठे शक्ती प्रदर्शन केले. पक्षाच्या वसंत मार्केट येथील कार्यालयापासून भव्य रॅली काढत शहरांमध्ये पक्षाने आपली ताकद दाखवली. पारंपारिक नृत्य, महिलांचे झांजपथक व पारंपारिक वाद्याच्या निनादामध्ये आणि श्रमिक एकजुटीच्या गगनभेदी घोषणांच्या आवाजात शहरातून महाराजा लॉन्स पर्यंत ही रॅली काढण्यात आली.

महाराजा लॉन्स या ठिकाणी यानंतर सभा घेण्यात आली. पक्षाचे जिल्हा सचिव व किसान सभेचे राज्य सहसचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत डॉ. अशोक ढवळे यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनता विरोधी व धर्मांध धोरणांवर कडाडून टीका केली. धर्म व जातीच्या नावाखाली श्रमिकांमध्ये फूट पाडून भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरणारे सरकार या निवडणुकीत जनता पराजित करेल व धर्मनिरपेक्ष विचाराचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. एकीकडे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या धर्मांध सरकारचा पराभव करत असताना दुसऱ्या बाजूला श्रमिकांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे डावे पक्ष व संघटनांची राजकीय ताकद विधानसभेमध्ये वाढवण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डाव्या पक्षांचे प्रतिनिधी सभागृहात असतील तर ते शेतकरी, कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न व सामान्य जनता तथा श्रमिकांचे प्रश्न अधिक अभ्यासपूर्वक व आग्रहपूर्वक सभागृहात मांडतील आणि धोरणांमध्ये त्यानुसार बदल करण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यात महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली असून महाविकास आघाडीने या 12 जागा महाराष्ट्रातील कम्युनिस्ट पक्षांना सोडाव्यात तसेच डाव्या पक्षांचे आग्रह विचारात घेऊन जागांचे वाटप करावे तसेच हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व पक्षांना बरोबर घेत एकजूट व्यापक करावी असे प्रतिपादन डॉ. अशोक ढवळे यांनी केले.

अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 ला एकास एकच्या प्रक्रियेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता या दोन्ही पक्षांनी व काँग्रेसने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला संधी देत ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावी अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली. पक्षाकडे चळवळीतून तावून सुलाखून निघालेले अनेक उमेदवार असून पैकी चार उमेदवारांची तालुका कमिटीमध्ये निवड करण्यात आली होती. पैकी दोन उमेदवारांनी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितल्याने आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दोन नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. समशेरपुर गावचे लोकनियुक्त सरपंच कॉ. एकनाथ मेंगाळ व यापूर्वी माकपच्या वतीने निवडणूक लढवलेले व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत प्रभावी काम करत असलेले कॉम्रेड नामदेव भांगरे यापैकी राज्य कमिटी सांगेल तो माकपचा अकोले विधानसभेचा उमेदवार असेल. अकोले तालुक्यातील जनतेने चळवळीतून आलेल्या माकपच्या मागे आपली पसंती व्यक्त करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी संपन्न झालेल्या सभेमध्ये तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे, संगीता साळवे, गणेश ताजणे, हेमलता शेळके, नंदू गवांदे, रंजना पराड, निर्मला मांगे, वैशाली सुरसे, वसंत वाघ, भीमा मुठे, शिवराम लहामटे, प्रकाश साबळे, अनिता साबळे, मथुराबाई बर्डे, ताराचंद विघे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
