बाह्य शक्तीला रोखा… त्यांना त्यांची जागा दाखवा — डॉ. जयश्री थोरात
युवा संवाद यात्रेचे विविध गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत
प्रतिनिधी —
संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवकांची भव्य जनसंवाद यात्रा सुरू असून या युवा संवाद यात्रेचे प्रत्येक गावामध्ये मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने अभूतपूर्व स्वागत होत असून युवकांमध्ये मध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या या यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खाडगाव, नीमज सांगवी, चंदनपुरी, झोळे, सावरगाव तळ यांचा पश्चिम भागातील विविध गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या युवा संवाद रॅलीमध्ये संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसचे सुमारे दोन हजार पदाधिकारी सहभागी असून प्रत्येक गावातील युवकांशी संवाद साधत आहे. यावेळी प्रत्येक गावात ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने स्वागत होत असून विविध ठिकाणी जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली आहे. तरुणाईचा उत्साह, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची मोठी उपस्थिती हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरत आहे.

सावरगावतळ यासह विविध गावात बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुका हा आज समृद्ध म्हणून गौरवला जात आहे. सुसंस्कृत राजकारणाची व सर्वधर्मसमभावाची समृद्ध परंपरा आपल्या तालुक्याला लाभली आहे. येथील सहकार, शिक्षण व्यवस्था, समाजकारण, राजकारण, बाजारपेठ, आर्थिक समृद्धी, शेतीतील प्रगती हे राज्यासाठी दिशादर्शक आहे. आमदार थोरात यांनी जीवनाचे ध्येय म्हणून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. हे पाणी दुष्काळी भागात आले आहे. बाजारपेठ फुलली आहे.

मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायची आहे. संगमनेर तालुका आमदार थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ला मध्ये शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, महिला, व्यापारी, विद्यार्थी असे गुन्ह्यागोविंदाने नांदत आहे. हे वातावरण आपल्याला असेच ठेवायचे आहे. तालुक्याची प्रगती रोखण्याकरता बाहेरून अनेक हल्ले होतील. हे सर्व हल्ले एकजुटीने रोखायचे आहेत.

विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांना तालुका पूर्ण माहीत नाही. निवडणुकीसाठी खोटे बोलणारे लोक आता येणार आहेत. त्यांना त्यांची वेळीच जागा दाखवा असे आवाहन त्यांनी केले. या युवा संवाद यात्रेत काँग्रेस युवक काँग्रेस व काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी यांसह संगमनेर तालुक्यातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

विकासाची संस्कृती पुढे घेऊन जाण्यासाठी युवा संवाद यात्रा
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सांगली परंपरा या तालुक्यात आहे. भौगोलिक परिस्थिती भिन्न असताना सुद्धा संगमनेरने मोठी प्रगती केली आहे. आपली चांगली कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबर तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला जाणार असल्याचे डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.
